नाला पार करून गर्भवती महिलेला आणले रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:35 AM2018-08-30T01:35:44+5:302018-08-30T01:36:52+5:30
सिझर प्रसूतीसाठी कुरखेडा येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागणार असल्याचे सांगितल्यानंतर वैतागलेल्या सिकलसेलग्रस्त एका गर्भवती आदिवासी महिलेने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात घरचा रस्ता धरला. ही माहिती मिळताच प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
सिराज पठाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : सिझर प्रसूतीसाठी कुरखेडा येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात जावे लागणार असल्याचे सांगितल्यानंतर वैतागलेल्या सिकलसेलग्रस्त एका गर्भवती आदिवासी महिलेने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात घरचा रस्ता धरला. ही माहिती मिळताच प्रशासनाची तारांबळ उडाली होती. घरी परतल्यानंतर रुग्णालयात न येण्याचा हट्ट धरणाऱ्या संबंधित गर्भवती महिलेला अधिकाऱ्यांच्या आदेशावरून कर्मचाऱ्यांनी दोन किमीची पायपीट करून व नाला ओलांडून महिलेचे घर गाठावे लागले. महिलेची समजूत काढून परत तिला कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले.
सदर घटनेदरम्यान तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचारीही जागरूक झाले होते. प्रशासनाने प्रचंड परिश्रम करीत एखाद्या गर्भवती महिलेला न्याय देण्याचा हा पहिलाच प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. कोरची तालुक्यातील झोरातलाई येथील सुनीता श्यामलू बोगा (२४) या गर्भवती महिलेला प्रसूतीची तारीख २ आॅगस्ट देण्यात आली होती. तिचे माहेर कुरखेडा तालुक्याच्या अतिदुर्गम कोटलडोह हे गाव आहे. स्थानिकस्तरावर या महिलेची प्रसूती न झाल्याने ६ आॅगस्ट रोजी सदर महिलेला कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथे सुद्धा तब्बल १४ दिवस प्रतीक्षा करूनही प्रसूती झाली नाही. सदर महिलेला रक्ताची कमतरता असल्याने व सिझर प्रसूती करणे गरजेचे असल्याचा सल्ला देण्यात आला होता. गडचिरोली येथे हलवावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बरेच दिवस प्रतीक्षा करूनही प्रसूती होत नसल्याचे पाहून सुनीता बोगा या महिलेने कुटुंबासह घरचा रस्ता धरला. चारभट्टी येथील आरोग्य उपकेंद्राच्या अधिपरिचारिकेने कोटलडोह येथे भेट दिली असता, पूर्ण दिवस झालेली गरोधर महिला निदर्शनास आले. सदर परिचारिकेने तिला रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र सुनीताने रुग्णालयात जाण्यास स्पष्ट नकार दिला. घरीच प्रसूती करण्याचा हट्ट तिने धरला. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर परिचारिकेने याबाबीची माहिती तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिली.
आरोग्य अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुरखेडाच्या तहसीलदारांना दिली. त्यानंतर तत्काळ बुधवारी १२ वाजताच्या सुमारास तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार मडावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश दामले, अधिपरिचारिका रेखा गेडाम, प्रियंका मस्के यांनी चारचाकी वाहनाने चारभट्टी हे गाव गाठले. येथून पुढे कोटलडोह गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. तसेच नाल्यावर पूल नसल्याने सदर महिलेला आणण्यासाठी कोटलडोहला पोहोचण्याची अडचण होती. दोन किमीची पायपीट करीत अधिकारी व कर्मचाºयांनी सदर गर्भवती महिला असलेले घर गाठले. आरोग्य परिस्थितीची तिला जाणीव करून देत तिची समजूत घातली. नाल्यातील गुडघाभर पाण्यातून तिला आधार देत तिला चारभट्टी येथे आणण्यात आले.य् येथून तिला चारचाकी वाहनाने कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनीता बोगा हिची प्राथमिक तपासणी करण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर सदर महिलेला गडचिरोलीच्या महिला रुग्णालयात हलविण्याची तयारी आरोग्य विभागातर्फे सुरू होती. एकूणच प्रशासन थेट ग्रामीण भागात पोहोचल्याने गर्भवती महिलेला दिलासा मिळाला.