उकाड्याने रूग्णालयात रूग्ण बेचैन
By admin | Published: May 18, 2016 01:25 AM2016-05-18T01:25:55+5:302016-05-18T01:25:55+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रत्येक वार्डामध्ये चार कुलर लावण्यात आले आहेत. या कुलरमध्ये बाथरूममधील पाणी भरण्यासाठी पाईपही देण्यात आला आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयातील स्थिती : कुलर आहेत, मात्र कर्मचारी पाणी भरत नाही
दिगांबर जवादे गडचिरोली
जिल्हा सामान्य रूग्णालयातील प्रत्येक वार्डामध्ये चार कुलर लावण्यात आले आहेत. या कुलरमध्ये बाथरूममधील पाणी भरण्यासाठी पाईपही देण्यात आला आहे. मात्र आरोग्य कर्मचारी नियमितपणे कुलरमध्ये पाणी भरत नसल्याने रूग्णालयातील बहुतांश कुलर कोरडेठाक असल्याचे मंगळवारी दुपारी १२ वाजता लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीदरम्यान दिसून आले. त्यामुळे रूग्णांचे गर्मीने सध्या बेहाल सुरू आहे. अहेरी येथे रूग्णालयात जनरेटर बंद असल्यामुळे नवजात बालकांना घेऊन मातांना बाहेर रात्र काढावी लागली. या घटनेनंतर जिल्हा रूग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यात अनेक धक्कादायक प्रकार पुढे आले.
जिल्हा सामान्य रूग्णालयात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील रूग्ण तसेच चंद्रपूर जिल्हा व छत्तीसगड राज्यातीलही रूग्ण दाखल होतात. सध्या ग्रामीण भागामध्ये तापाची साथ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे शेकडो रूग्ण रूग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. बेड कमी पडत असल्याने काही रूग्णांना फरशीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागत आहे.
प्रत्येक वार्डामध्ये जवळपास ३२ बेड आहेत व जमिनीवर गादी टाकून जवळपास १६ रूग्ण उपचार घेतात. म्हणजेच प्रत्येक वार्डामध्ये जवळपास ५० रूग्ण दर दिवशी उपचार घेतात. उन्हाळ्यातील गर्मीमुळे रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक वार्डामध्ये चार कुलर लावण्यात आले आहेत. कुलरमध्ये त्याच वार्डातील बाथरूममधील नळाला पाईप लावून पाणी भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक वार्डासाठी स्वतंत्र पाईप देण्यात आला आहे. व या कुलरमध्ये नियमितपणे पाणी भरण्याची जबाबदारी संबंधित वार्डातील आरोग्य कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र आरोग्य कर्मचारी कुलरमधील पाण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे कित्येक तास कुलर कोरड्या ठाक पडून राहतात व केवळ कुलरचा पंखाच फिरत राहतो. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक कुलरवर ‘कुलरला हात लावू नये’ अशी सूचना लिहिले कागद चिकटविण्यात आले आहे. त्यामुळे रूग्ण व त्यांचे नातेवाईक कुलरला हात लावत नाही व पाणी संपले आहे, हे आरोग्य कर्मचाऱ्याला सांगण्याची हिंमतही करीत नाही. त्यामुळे कोरडाच कुलर सुरू राहतो. सर्वात वरचा मजला मोठ्या प्रमाणात तापत असल्याने येथील रूग्णांची सर्वात मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येते. विशेष करून नवजात बालके व त्यांच्या मातांचे गर्मीमुळे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
पाच वर्षांपासून खस बदलविले नाही
पाण्याचा निचरा होण्यावर कुलरची थंड हवा अवलंबून आहे. त्यामुळे किमान दोन वर्षानंतर कुलरची खस बदलविणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र रूग्णालयातील बहुतांश कुरलरची खस मागील पाच वर्षांपासून बदलविली नसल्याचे दिसून आले. काही कुलरची अर्धी अधिक खस जाळीतून निघून गेली आहे. त्या ठिकाणी छिद्र पडले आहेत. तर काही कुलरच्या खसवर धुळीचा थर बसला आहे. त्यामुळे पाणी अलगदपणे वरून सरळ पाण्याच्या टाकीमध्ये पडते. या सर्वांचा परिणाम म्हणजे कुलरची हवा पाहिजे त्या प्रमाणात थंड येत नाही. काही कुलरची स्पिडही कमी आहे. तेवढ्या मोठ्या वार्डामध्ये केवळ चार कुलर लावण्यात आल्या आहेत. त्या पुरेशा नसल्याचे दिसून येते.