रूग्णालय आजारी

By admin | Published: July 27, 2014 12:07 AM2014-07-27T00:07:12+5:302014-07-27T00:07:12+5:30

अतिदुर्गम, नक्षल प्रभावित सर्वसामान्य तसेच गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतूने अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात आले. मात्र या रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पद

The hospital is sick | रूग्णालय आजारी

रूग्णालय आजारी

Next

अहेरी उपजिल्हा : रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर परिणाम
अहेरी : अतिदुर्गम, नक्षल प्रभावित सर्वसामान्य तसेच गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतूने अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात आले. मात्र या रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञाची या रूग्णालयात वानवा आहे. यामुळे वेळेवर आरोग्य तपासणी होत नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. यामुळे हे रूग्णालय स्वत:च आजारी असल्याचे दिसून येते.
अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यातील अतिदुर्गम भागातून अनेक रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र या रूग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होताना दिसते. या रूग्णालयात सध्या एक वैद्यकीय अधीक्षक, बालरोग तज्ज्ञ व दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. सद्यस्थितीत या रूग्णालयात बधिरीकरण तज्ज्ञ, भाषक, पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्र चिकित्सक, अस्थिरोग तज्ज्ञ, रेडिओलॉयजीस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिसेविका व दोन अधिपरिचारिका आदी पदे रिक्त आहेत. यामुळे रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कार्यरत डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. परिणामी त्यांनाही तारेवरची कसरत करून रूग्णांना आरोग्य सेवा द्यावी लागत आहे. या रूग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्यामुळे मलेरिया, सिकलसेल, हिमोग्लोबीन व इतर रक्ताच्या चाचण्या वेळेवर होत नाही. रूग्णांचे रक्त घेऊन ते परिश्रमासाठी गडचिरोलीला पाठविले जाते. या तपासणीचे रिपोर्ट येण्यासाठी ८ ते १० दिवसाचा कालावधी लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले असून या आजाराचे रूग्ण मोठ्या संख्या या रूग्णालयात दाखल होत आहेत. दाखल रूग्णांच्या रोगाचे निदान वेळेवर होत नसल्याने येथील रूग्णांची प्रकृती खालावत असल्याचेही दिसून येत आहे. या रूग्णालयातून ऐन वेळेवर रूग्णांना नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे हलविले जात आहे. दूरवरून आलेल्या गरीब रूग्णांकडे पैसे नसल्यामुळे त्यांची अशावेळी चांगलीच पंचाईत होत आहे. पूर्णवेळ बधीरीकरण तज्ज्ञ नसल्यामुळे एखाद्या शस्त्रक्रियेसाठी बराच वेळ जात आहे. या रूग्णालयात पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिला रूग्णांचे हेळसांड होत आहे. रिक्त पदे भरून आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

Web Title: The hospital is sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.