रूग्णालय कर्मचाऱ्यांचा संसार उघड्यावरच
By admin | Published: November 22, 2014 11:01 PM2014-11-22T23:01:24+5:302014-11-22T23:01:24+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कर्मचारी कॉलनीतील निवासस्थानांचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्याचबरोबर तीन कंत्राटदारांमध्ये ताळमेळ नसल्याने येथील कर्मचाऱ्यांच्या घरातील
गडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कर्मचारी कॉलनीतील निवासस्थानांचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्याचबरोबर तीन कंत्राटदारांमध्ये ताळमेळ नसल्याने येथील कर्मचाऱ्यांच्या घरातील सामान उघड्यावर पडले आहे. त्याचबरोबर रात्रीसुध्दा कुडकुडत्या थंडीत बाहेरच झोपावे लागत आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी रूग्णालयाच्या मागे स्वतंत्र कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व सफाई कामगार यांचे एकूण १५० निवासस्थाने आहेत. या निवासस्थानांच्या दुरूस्तीचे काम कंत्राटदारांच्या मार्फतीने मागील ८ दिवसांपासून सुरू आहे. निवासस्थानाची पेटींग करणे, टाईल्स लावणे व दरवाजे बसविण्यासाठी तीन स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. या तिनही कंत्राटदारांच्या कामगारांचा ताळमेळ नाही. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागत आहे.
टाईल्सचे काम करणारे मजूर येऊन टाईल्स लावण्यासाठी घरातील सामान काढायला लावतात. टाईल्स लावण्यासाठी ४ ते ५ मजूर आहेत. सदर मजूर एका निवासस्थानाला टाईल्स लावण्यासाठी दोन दिवस लावतात. त्यानंतर ते निघून जातात. आणखी एक-दोन दिवसानंतर दरवाजे लावणारे मजूर येतात. सदर मजुरही घरातील सामान काढायला लावतात. दरवाजे लावण्याचे काम झाल्यानंतर आणखी सामान घरामध्ये ठेवल्या जाते. त्यानंतर रंगरंगोटी करणारे मजूर येऊन घरातील सामान काढायला लावतात. या सर्व प्रकारामुळे येथील कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्याचबरोबर एका क्वॉर्टरचे काम अपूर्ण असताना ते पूर्ण करण्याऐवजी अनेक घरात काम सुरू करून कुणाचेही काम पूर्णत्वास नेण्यासाठी तसदी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास या तीन कंत्राटदारांच्या पध्दतीमुळे सहन करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी टाईल्स व्यवस्थित लावण्यात आल्या नाही. टाईल्स लावल्यानंतर शौचालय व बाथरूमला दरवाजा लावण्यात आला नाही. काही दरवाजे व्यवस्थित लागतच नाही. खिडक्यांना तावदाने लावण्याची तरतूद आहे. मात्र खिडक्या तावदाणेसुध्दा लावण्यात आले नाही. प्रत्येक किचन ओट्यामध्ये बेसीन लावण्यात आली आहे. मात्र पाणी निघण्यासाठी मार्ग देण्यात आला नाही. काही दरवाजे नवीन असले तरी त्यांना कब्जे मात्र जुनेच लावण्यात आले आहेत.
बांधकामानंतर निर्माण झालेला कचरा निवासस्थानांच्या मागेच फेकण्यात आला आहे. या सर्व बाबींकडे जिल्हा शल्य चिकित्सकांनी लक्ष घालावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
(नगर प्रतिनिधी)