दुर्गम भागात घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:38 PM2017-12-22T23:38:14+5:302017-12-22T23:38:29+5:30
दुर्गम भागातील झिंगानूर चेक नंबर १ येथील शंकर वाघा मडावी यांच्या घराला दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर (गडचिरोली) : दुर्गम भागातील झिंगानूर चेक नंबर १ येथील शंकर वाघा मडावी यांच्या घराला दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. विशेष म्हणजे सिरोंचा या तालुका मुख्यालयी असलेले अग्निशमन वाहन रस्त्याअभावी गावात येऊ शकत नसल्याचे लक्षात आल्याने आगीत सर्व साहित्य स्वाहा झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नाही.
शंकर मडावी यांचे कुटुंब कामानिमित्त बाहेर गेले असताना दुपारच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच गावातील नागरिकांनी विहिरीचे पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र घर कौलारू असल्याने आग आटोक्यात आली नाही. सिरोंचा येथे अग्निशमन बंब असले तरी सिरोंचापासून झिंगानूर हे गाव जपळपास ४० किमी अंतरावर आहे. दुर्गम भागातील या गावात पोहोचण्यासाठी रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. परिणामी वेळेवर अग्निशमन यंत्र पोहोचणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर गावकºयांनी आपल्या परीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये यश आले नाही. संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील एकही साहित्य मडावी कुटुंबाला बाहेर काढता आले नाही. जळालेल्या साहित्यामध्ये लाकूड फाटे, सागवानी पाट्या, कपडे, भांडी, १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, दोन तोळे चांदी, एक क्विंटल धान, ५० किलो मका व इतर घरगुती साहित्याचा समावेश आहे.