उंदरांच्या कारनाम्याने घराला आग
By admin | Published: November 6, 2016 01:32 AM2016-11-06T01:32:12+5:302016-11-06T01:32:12+5:30
येथील मच्छीमार्केट प्रभाग क्र. ९ मधील रहिवासी रामदास वाघाडे यांच्या घरातील सांजवात उंदरांनी नेल्याने
चामोर्शीतील घटना : सांजवात कपड्यांच्या ढिगावर टाकल्याने लागली आग
चामोर्शी : येथील मच्छीमार्केट प्रभाग क्र. ९ मधील रहिवासी रामदास वाघाडे यांच्या घरातील सांजवात उंदरांनी नेल्याने घराला आग लागल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत घरातील सर्व कपडे, कागदपत्र, चादर, सुटकेस आदी साहित्य जळून खाक झाले.
रामदास वाघाडे यांनी नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी देवघरात सांजवातीचा दिवा लावला होता व ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. देवघरात लावलेल्या सांजवातीच्या दिव्याची वात उंदरांनी ओढत नेली. ती वात त्याच खोलीत असलेल्या कपड्यांच्या ढिगावर नेऊन टाकली. पाहतापाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याची माहिती धुरामुळे शेजाऱ्यांना मिळाली. त्यांनी घरात प्रवेश करून बघितले असता, कपडे व घरातील साहित्य जळत असल्याचे लक्षात आले. नागरिकांनी आरडाओरड करून सभोवतालच्या नागरिकांना बोलविले. वॉर्डातील नागरिकांनी एकत्र येत पाण्याच्या सहाय्याने तत्काळ आग विझविली. त्यामुळे मोठा धोका टळला. घटनेच्या दिवशी विटाबाई ही बाहेरगावी गेली होती. मुलगा गावातच दुसरीकडे किरायाणे राहतो. घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली. तलाठ्यांनी पंचनामा करण्यासाठी कोतवाल कालिदास मांडवगडे यांना पाठविले. वाघाडे यांना मदत देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)