संततधार पावसाने घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2016 01:31 AM2016-07-09T01:31:05+5:302016-07-09T01:31:05+5:30
यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक संततधार पाऊस ८ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यात झाल्याने बळीराजा पूरता सुखावला आहे.
बळीराजा सुखावला : जिल्ह्यात सरासरी १५.७५ मिमी पाऊस पडला
गडचिरोली : यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक संततधार पाऊस ८ जुलै रोजी गडचिरोली जिल्ह्यात झाल्याने बळीराजा पूरता सुखावला आहे. धानाच्या बांध्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी जमा झाले असल्याने आता चिखलणी व रोवणीच्या कामाला वेग येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात १५.७५ मिमी पाऊस झाल्याची नोंद नियंत्रण कक्षाने घेतली आहे. गडचिरोली तालुक्यात १०.४, धानोरा १६.२, चामोर्शी १, मुलचेरा १.८, देसाईगंज ३३, आरमोरी २८.४, कुरखेडा ४४.१, कोरची ५०.५, एटापल्ली २.२, भामरागड १.८ मिमी पाऊस झाला. तर अहेरी व सिरोंचा तालुक्याच्या पावसाची नोंद नियंत्रण कक्षाकडे झाली नाही. एकूण १८९.४ मिमी पाऊस १५.७५ च्या सरासरीने जिल्ह्यात झाला. ८ जुलैपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४७८०.१ मिमी पाऊस झाला. या पावसाने शेतकरी सुखावला असून जिल्ह्याच्या सर्वच भागात हा पाऊस झालेला आहे. ८ ते १० जुलै या काळात विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यातही अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. गडचिरोली शहरातही अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावर नाल्या तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत जात होते. पोलीस ठाण्यासमोरील मोटवानी कॉम्प्लेक्सजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याने नजीकच्या दुकानांमध्येही पाणी दिसून येत होते. पावसामुळे दिवसभर शहरातील वाहतूक रोडावलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले. सखल भागात पाणी साचल्यामुळे पादचारी व दुचाकी वाहनधारक यांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागला. दुसरा शनिवार व रविवारची सुटी आहे. दुर्गम भागात मुख्यालयी राहून सेवा देणारे कर्मचारी घराकडे निघाले. मात्र कमी उंचीच्या पुलांवर पाणी जमा झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. याचा फटका नागरिकांसह कर्मचाऱ्यांना बसला. पुलावरील पाण्याने बसफेऱ्याही रद्द झाल्या. (जिल्हा प्रतिनिधी)