तलावांमध्ये वस्त्या वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:16 PM2017-10-29T23:16:49+5:302017-10-29T23:17:11+5:30
गडचिरोली शहरात पाच तलाव आहेत. या तलावांमध्ये अतिक्रमण करून नागरिकांनी घरे बांधली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरात पाच तलाव आहेत. या तलावांमध्ये अतिक्रमण करून नागरिकांनी घरे बांधली आहेत. अतिक्रमणाचा दरवर्षी विस्तार होत असल्याने तलावांचे अस्तित्व धोक्यात आले असून त्यावर अवलंबून असलेली शेतजमीनही अडचणीत आली आहे.
जिल्हा निर्मितीपूर्वी गडचिरोली हे लहानसे खेडे होते. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने गावाच्या सभोवताल पाच तलाव होते. आता हे चारही तलाव शहरात सापडली आहेत. जिल्हा मुख्यालय असल्याने दरवर्षी घरांच्या संख्येत भर पडत आहे. गडचिरोली शहराला विस्तारासाठी फार कमी जागा असल्याने जागेच्या किंमती नागपूर शहराच्या तुलनेतही अधिक आहेत. काही नागरिकांनी तलावामध्ये अतिक्रमण करून जागा पकडली आहे. शहराच्या मध्यभागी आठवडी बाजाराजवळ असलेल्या तलावात तर चारही बाजुने अतिक्रमण झाले आहे. गोकुलनगर मार्गाच्या बाजुला शेकडो घरे बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर गडचिरोली-मूल मुख्य मार्गाच्या बाजुलाही काही नागरिकांनी संरक्षण भिंत टाकून तलावाची जागा आपल्या ताब्यात घेतली आहे. गडचिरोली शहरातील जागेचे भाव बघितले तर सदर जागा कोट्यवधी रूपयांची आहे. आरमोरी मार्गावर असलेल्या तलावातही काही नागरिकांनी घरे बांधली आहेत. पावसात तलाव भरल्यानंतर तलावाचे पाणी अंगणात साचते. त्यावेळी दोष नगर परिषदेला दिला जातो. मात्र तलावामध्ये आपण अतिक्रमण करून अवैधरित्या घर बांधले, याची जाणीव या नागरिकांना होत नाही. केवळ नगर परिषदेच्या नावाने बोटे मोडण्याचे काम करीत आहेत. बसस्थानकाजवळ असलेल्या तलावातही अतिक्रमण वाढत चालले आहे. लांझेडा वार्डातील तलावात अलिकडेच नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत.
सिंचन विभाग सुस्त
शहरातील तलावांमध्ये अतिक्रमण करून जागा गिळंकृत केली जात असताना सिंचन विभाग मात्र केवळ बघ्याची भूमिका स्वीकारत आहे. काही नागरिक जागा पकडून ती लाखो रूपयांना विकत आहेत. जागा पकडून विकणे हा काही नागरिकांचा धंदाच बनला आहे. परिणामी अतिक्रमणाची समस्या वाढत चालली आहे. याकडे सिंचन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.