वाढत्या महागाईने घरकुल बांधकामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:56+5:302021-04-12T04:34:56+5:30
देसाईगंज तालुक्यातील लोकसंख्येच्या आधारावर व क्षेत्रफळानुसार कुरुड आणि कोंढाळा ही गावे माेठी आहेत. या दाेन्ही गावांत बऱ्याच प्रमाणात लाभार्थ्यांना ...
देसाईगंज तालुक्यातील लोकसंख्येच्या आधारावर व क्षेत्रफळानुसार कुरुड आणि कोंढाळा ही गावे माेठी आहेत. या दाेन्ही गावांत बऱ्याच प्रमाणात लाभार्थ्यांना घरकुल मिळाले आहेत, तर अनेक घरांची कामे सुरू आहेत; परंतु सद्या नवीन घराचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव गगनाला भिडल्याने अनेक नवीन घरांचे स्वप्न आजच्या घडीला महागाईच्या विळख्यात सापडले आहे. घरकुलासाठी लागणाऱ्या साहित्याची किंमत जास्त, तर घरकुलासाठी निधी पुरेसा नसल्याची माहिती घरकुल लाभार्थी देत आहेत. एकदाच घर होते म्हणून लाभार्थी चांगल्याप्रकारे घर बांधत असतो; मात्र त्याचा फटका त्यालाच सहन करावा लागतो. कोंढाळा येथील नागरिक व्याजाने पैसे काढून घर पूर्ण करत आहेत, तर सकाळी दुसऱ्याच्या कामावर व रात्री घरी काम करून दोन पैसे जास्त मिळवून स्वतःच घर बांधत आहेत. मात्र, दरवाढीने नागरिकाचे कंबरडे मोडले आहेत.
आधीच बांधकामाच्या साहित्याचे वाढलेले भाव, आता त्यात इंधन दरवाढीची भर पडली आहे. कारण इंधन दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च पण वाढला असल्याने घरकुल लाभार्थीला जास्त प्रमाणात पैसे मोजावे लागत आहेत. तसेच विटांचे भाव ८ ते ९ हजार रुपये ट्रिप आहे, तर दुसरीकडे सिमेंटचे भाव वाढले आहेत आणि रेती तर मिळतच नसल्याने घरकुल लाभार्थ्यांचे हाल होत आहेत.