माझ्यापेक्षा मैत्रिणीला जास्त गुण कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:10+5:302021-08-23T04:39:10+5:30
गडचिराेली : दीड वर्षांपासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात इयत्ता दहावी व बारावीची बाेर्डाची परीक्षा ...
गडचिराेली : दीड वर्षांपासून काेराेना विषाणूच्या संसर्गाचा धाेका कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात इयत्ता दहावी व बारावीची बाेर्डाची परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना गुणदान करण्यात आले. परंतु, अनेक हुशार विद्यार्थ्यांनाही इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी गुण मिळाल्याने हुशार विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले. त्यांच्यातील शैक्षणिक ओढ कमी झाल्याचे दिसून येते.
बाॅक्स
परीक्षा नाही, पुनर्मूल्यांकनही नाही
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नववीतील वार्षिक परीक्षांच्या आधारावर तसेच त्यांची शाळेतील शैक्षणिक प्रगती यानुसार गुणदान करण्यात आले. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा अकरावीतील वार्षिक गुण व शाळेतील शैक्षणिक प्रगती तसेच बुद्धिमता याच्या आधारावर गुणदान झाले. परीक्षा न झाल्याने विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकत नाही.
स्थानिक शाळांमध्येच पालकांच्या शंकांचे झाले निरसन
इयत्ता दहावी व बारावीच्या अनेक हुशार विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले, तर त्यांच्यापेक्षा अल्प हुशार असलेल्या काहींना अधिक गुण मिळाल्याने बहुतांश पालकांनी केवळ शाळास्तरावर संबंधित मुख्याध्यापकांकडे शिक्षकांनाच विचारणा केली. शिक्षण विभाग अथवा परीक्षा बाेर्डाकडे तक्रारी केल्या नाही. विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणदान करण्यात आले याबाबत समजावून सांगितल्यानंतर त्यांचाही राेष मावळला.
विद्यार्थी म्हणतात...
आमच्या वर्गात मी सर्वांत हुशार विद्यार्थी हाेताे. इयत्ता नववीपर्यंत घेतलेल्या सर्वच वार्षिक व सराव परीक्षांमध्ये मला सर्वाधिक गुण मिळायचे. गणित व इंग्रजी हा विषय माझा सर्वाधिक आवडीचा. परंतु, याच विषयात मला बरेच कमी गुण मिळाले.
- गाैरव मडावी, विद्यार्थी
इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला प्रावीण्य श्रेणी मिळाली हाेती. बारावीतही अपेक्षेनुसार प्रावीण्य श्रेणीच मिळेल, अशी अपेक्षा हाेती. त्यानुसार मी अभ्यासही केला. परंतु, परीक्षाच न झाल्याने गुण मिळविणे आपल्या हाती नव्हते. अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही.
- स्वप्निल गंडाटे, विद्यार्थी
निकालावर नाराज असलेले पालक म्हणाले....
काेराेना संकटामुळे इयत्ता दहावी व बारावीची बाेर्डाची परीक्षा झाली नाही. शाळांमार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार गुण मिळतील, असे वाटत हाेते. परंतु, माझ्यासह अनेक पालकांचा हिरमाेड झाला. अनेक पालक नाराज आहेत.
विशाल साेनकुसरे, पालक
माझा मुलगा वर्गात सर्वांत हुशार हाेता. त्याला बाेर्डाच्या परीक्षेतही चांगले गुण मिळतील अशी आशा हाेती. परंतु, शाळेतील बहुतांश शिक्षकांनी मर्जीतील विद्यार्थ्यांनाच अधिक गुण दिले व इतरांना दुय्यम स्थान दिल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले.
- सुधाकर चापले, पालक