भूमिहीन व्यक्तींच्या खात्यात कशे आले धानाचे बोनस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 03:18 PM2024-10-15T15:18:44+5:302024-10-15T15:19:37+5:30
Gadchiroli : उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिले चौकशीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदा राज्य शासनाने सरसकट हेक्टरी २० हजार रुपये बोनस दिला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु, चामोर्शी तालुक्यात काही भूमिहीन व्यक्तींच्या खात्यातही धानाचा बोनस जमा झाल्याची तक्रार उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झाली. यानंतर उपमुख्यमंत्री कार्यालयाने पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत. धान बोनस गैरव्यवहाराची व्याप्ती किती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात धान भरडाई घोटाळा, तांदूळ तस्करी नवीन नाही. त्यात आता धान बोनस वाटपातही गैरव्यवहाराची तक्रार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पिपरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या घोटाळ्यासंबंधित दस्तऐवज सादर करून चौकशीची मागणी केली आहे. या तक्रारीनुसार, चामोर्शीत भूमिहीन व्यक्तींच्या नावे शेती दाखवून त्यांच्या खात्यावर प्रत्येकी ४० हजार रुपये जमा केले. त्यानंतर संबंधित व्यक्तींना दोन ते तीन हजार देऊन उर्वरित रक्कम इतरत्र वळती करण्यात आली. उपमुख्यमंत्री कार्यालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर गैरव्यवहार करणारे रडारवर येण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात पणन महासंघाचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी विश्वनाथ तिवाडे यांना संपर्क केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू कळू शकली नाही.
जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ?
यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या घोटाळ्यात त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या बोगस लाभाथ्यांची यादीच तक्रारीसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आली आहे.