महिला उभी असताना राखीव जागांवर तुम्ही कसे बसता भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2022 05:00 AM2022-05-09T05:00:00+5:302022-05-09T05:00:16+5:30
सर्वसाधारण बसमध्ये जवळपास ४४ सीट राहतात. त्यापैकी काही सीट दिव्यांग, महिला, आमदार, कर्तव्यावर जाणारे कर्मचारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, पत्रकार यांच्यासाठी काही सीट राखीव राहतात. त्यापैकी आमदार अपवादानेच बसमध्ये बसतात. मात्र, दिव्यांग व महिलावर्ग माेठ्या प्रमाणात बसने प्रवास करतात. बसमधील सीट आरक्षित असल्या तरी या आरक्षणाचा लाभ फार कमी जण घेतात.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : एसटीमध्ये दिव्यांग, महिला, आमदार, कर्तव्यावर जाणारे कर्मचारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, पत्रकार यांच्यासाठी काही सीट आरक्षित ठेवल्या जातात. मात्र या आरक्षणाबाबत दिव्यांग व महिला यांच्यामध्ये फारशी जागृती नसल्याने आरक्षित सीट असतानाही त्यांना उभे राहावे लागते.
सर्वसाधारण बसमध्ये जवळपास ४४ सीट राहतात. त्यापैकी काही सीट दिव्यांग, महिला, आमदार, कर्तव्यावर जाणारे कर्मचारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, पत्रकार यांच्यासाठी काही सीट राखीव राहतात. त्यापैकी आमदार अपवादानेच बसमध्ये बसतात. मात्र, दिव्यांग व महिलावर्ग माेठ्या प्रमाणात बसने प्रवास करतात. बसमधील सीट आरक्षित असल्या तरी या आरक्षणाचा लाभ फार कमी जण घेतात. आरक्षित सीटवर पुरुष प्रवासी बसलेला असताना महिला किंवा दिव्यांगांना उभे राहून प्रवास करावे लागत असल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.
वाहकाची भूमिका काय?
महिलेच्या आरक्षित जागेवर पुरुष बसला असेल व गर्दीमुळे महिला उभी असेल तर सीट आरक्षित सीट मिळण्यासाठी महिलेने वाहकाकडे तक्रार करावी. वाहक आरक्षित सीट महिलेला उपलब्ध करून देईल.
तक्रार हाेईपर्यंत कुणी कुठेही बसू शकताे
एसटीमध्ये असलेले आरक्षण हे सामाजिक आरक्षण आहे. त्यामुळे जाेपर्यंत त्या आरक्षणाचा प्रवासी येत नाही ताेपर्यंत त्या सीटवर कुणालाही बसण्याचा अधिकार आहे. संबंधित व्यक्तीने वाहकाकडे तक्रार केल्यानंतर त्याला सीट देण्यासाठी बसलेल्या प्रवाशाला ते सीट साेडावी लागेल.
बसने प्रवास करताना आमदाराला बघितले का?
एसटीची निर्मिती झाली त्यावेळचे आमदार कदाचित गरीब असावेत त्यामुळे ते एसटीने प्रवास करीत असल्याने विधानसभा सदस्य व विधान परिषद सदस्य या दाेघांसाठी दाेन सीट आरक्षित ठेवले आहेत. मात्र आत्ताचे आमदार निवडून आल्याबराेबर महागड्या चारचाकी गाड्यांमधून फिरतात ते कधीच एसटीत बसत नाही. त्यामुळे त्यांचे आरक्षण फालतूच असल्याचा आराेप प्रवाशांकडून हाेत आहे.
या क्रमांकाच्या सीट राहतात आरक्षित
आमदारांसाठी ७ व ८ क्रमांकाची सीट आरक्षित राहते. अपंगांसाठी ३, ४, ज्येष्ठ नागरिकांसाठी ५, ६, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांसाठी ११, १२, पत्रकारांसाठी १९, २९, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ३० व महिलांसाठी १३, १४, २०, २७, २८ क्रमांकांचे सीट आरक्षित राहते.
आरक्षित सीटबाबत संबंधित प्रवाशाने तक्रार केल्यास वाहक ते सीट संबंधित व्यक्तीला उपलब्ध करून देतात.
- मंगेश पांडे, आगारप्रमुख, गडचिराेली