कसं जायचं या रस्त्यावरून? गडचिरोलीतील मरीगुड्डम गावाची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 07:00 AM2020-12-15T07:00:00+5:302020-12-15T07:00:21+5:30
Gadchiroli News सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेले जंगलालगतच्या मरीगुड्डम गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षानंतरही विकासापासून कोसोदूर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेले जंगलालगतच्या मरीगुड्डम गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षानंतरही विकासापासून कोसोदूर आहे. या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. रस्त्याअभावी महामंडळाची बसगाडी जात नाही. मार्गावर नाला असून या नाल्यावरील रपटा खराब झाला आहे. सातत्त्याने मागणी करूनही शासन, प्रशासनाचे या गावाकडे कायम दुर्लक्ष झाले आहे.
मरीगुडम हे गाव मेडाराम ग्राम पंचायतींतर्गत येते. येथे ४० घरांची वस्ती असून लोकसंख्या २०० आहे. संपूर्ण गाव शेती व्यवसायावर अवलंबून असून हे गाव आदिवासी बहुल आहे. घनदाट जंगलाच्या मधोमध हे गाव वसलेले आहे. रस्ता बांधण्यात आला असला तरी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाटेत असलेल्या नाल्यावरील रपटा तुटलेला आहे. तो पूर्णत: नष्ट झाला आहे. त्यामुळे येथे रहदारीची समस्या बिकट झाली आहे. तालुका मुख्यालयापासून कमी अंतरावर हे गाव असूनही या गावात विकासाचा पत्ता नाही. सरकारने बारमाही वाहणाºया गावानजीकच्या नाल्यावर पुलाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.