५८० अपात्र शिक्षकांमध्ये गडचिरोलीचे शिक्षक किती ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 18:53 IST2025-04-15T18:52:55+5:302025-04-15T18:53:16+5:30
Gadchiroli : अल्पसंख्याकच्या दर्जासाठी चढाओढ

How many teachers are from Gadchiroli among the 580 ineligible teachers?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कथित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षण उपसंचालक नरड यांच्यासह पाच जणांना अटक झाल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. ५८० अपात्र शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी बनविल्याचे समोर आल्यानंतर यात जिल्ह्यातील किती शिक्षकांचा समावेश आहे, याची चर्चा सुरू आहे.
बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात प्राथमिक वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे यांच्या निलंबनानंतर ११ एप्रिल रोजी रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना सदर पोलिसांनी गडचिरोलीतून अटक केली.
शिक्षक भरती बंद असल्याने शिक्षण संस्थाचालकांना पदे भरता येत नव्हती. त्यामुळे त्यांची अडचण झाली होती. अशातच मंत्रालयस्तरीय अधिकाऱ्याच्या बनावट पत्राचा आधार घेत काही शिक्षण संस्थांनी पदभरती केल्याची चर्चा आहे. बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचे धागेदोरे याच्याशी आहेत का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
अल्पसंख्याकच्या दर्जासाठी चढाओढ
मधल्या काळात शिक्षक भरती बंद होती. केवळ अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळांना पदभरती करण्यास सूट दिली होती. पदभरतीच्या आडून मलिदा लाटण्यासाठी जिल्ह्यातील काही संस्थांनी नियमांना बगल देत अल्पसंख्याक दर्जा मिळवला. अल्पसंख्याक दर्जा मिळविण्यासाठी संस्थाचालकांत चढाओढ होती, यात मोठी उलाढाल झाल्याची चर्चा आहे. याची चौकशी होणार काय, असा प्रश्न उपस्थित होतोय.
दहा वर्षांपूर्वी होते शिक्षणाधिकारी
- शिक्षण उपसंचालक उल्हास नरड हे मूळचे गडचिरोलीचे आहेत. त्यांनी दक्षिण गडचिरोलीत आदिवासी शाळेत शिक्षक म्हणून काम केले होते. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेद्वारे ते शिक्षणाधिकारी झाले.
- दहा वर्षापूर्वी त्यांनी गडचिरोलीत शिक्षणाधिकारी म्हणून काम केले होते. अनेक संस्थाचालकांशी त्यांचे हितसंबंध असल्याची प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे.. त्यांच्या अटकेनंतर भांडाफोड होण्याच्या भीतीमुळे संस्थाचालकांची झोप उडाली आहे.