भाजपकडे किती येणार सभापतिपद?

By admin | Published: March 29, 2017 02:12 AM2017-03-29T02:12:31+5:302017-03-29T02:12:31+5:30

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला संपूर्ण बहुमत न मिळाल्याने आदिवासी विद्यार्थी संघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

How many times will the BJP chairperson? | भाजपकडे किती येणार सभापतिपद?

भाजपकडे किती येणार सभापतिपद?

Next

उत्सुकता कायम : राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हिपने राजकीय गोटात खळबळ
गडचिरोली : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला संपूर्ण बहुमत न मिळाल्याने आदिवासी विद्यार्थी संघ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबत मिळून भाजपने जिल्हा परिषदेत अध्यक्ष पद हस्तगत केले आहे. तर आदिवासी विद्यार्थी संघाला उपाध्यक्ष पद बहाल केले. २९ मार्च रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणूक होऊ घातली आहे. २० सदस्य असलेल्या भाजपच्या पदरात किती सभापती पद पडतात या विषयी जिल्हावासीयांसह भाजप कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजप जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे भाजपकडे जास्तीत जास्त पद राहिली पाहिजे, ही कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र आघाडी करून सत्ता स्थापन केली असल्याने भाजपला मित्र पक्षांनाही यात सोबत घ्यावे लागत आहे. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप आघाडीच्या बाजुने ३३ सदस्यांनी मतदान केले होते. आदिवासी विद्यार्थी संघ ऐनवेळी भाजपसोबत आल्याने राष्ट्रवादी काँग्रेससोबत ठरलेला सभापतींच्या दोन पदांचा फार्मुला कायम राहतो की त्यात बदल होतो हे सभागृहातच दिसून येईल. भाजपातही पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले अनेक दावेदार सभापती पदासाठी बाशिंग बांधून आहेत. २० पैकी १६ महिला भाजपकडून निवडून आल्या आहे. त्यामुळे भाजप आपल्याकडे अध्यक्ष धरून किमान तीन पदे ठेवणार, अशी सर्व सदस्यांना आशा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एक, आदिवासी विद्यार्थी संघाला एक सभापती पद दिले जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन सभापती पदावर दावा केल्या गेल्यास भाजपला एकच पद मिळेल. त्यामुळे भाजपातील २० सदस्यांची नाराजी वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याशिवाय भाजपच्या कोट्यातही पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासोबत असलेल्या अपक्ष वर्षा कौशीक यांचाही सभापती पदासाठी दावा आहे. त्यांना भाजप सभापती पद देते काय, याविषयीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेल्या रोशनी पारधी यांचे नाव अध्यक्ष पद स्पर्धेत होते. मात्र ऐनवेळी त्यांचे नाव कापण्यात आले. त्यामुळे त्यांना सभापती पद दिले जाऊ शकते, अशी देसाईगंजमध्ये चर्चा आहे. एकूणच भाजपचे नेते याबाबत काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे राहणार आहे. सध्या तरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांची बाजू पक्षात भक्कम असून या संदर्भात ते कशी रणनिती ठरवितात हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. आदिवासी विद्यार्थी संघ आपल्याकडे कोणत्या समितीचे सभापती पद ठेवतो याबाबतही चर्चा जोरात आहे. महिला बाल कल्याण समिती आल्यास आविसंकडून सभापती पदासाठी माजी आमदार दीपक आत्राम यांच्या पत्नी अनिता आत्राम यांची वर्णी लागू शकते. मात्र दुसऱ्या समितीचे पद आल्यास उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मर्जीतील जि.प. सदस्य अजय नैताम यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. आविसं कुणाची वर्णी लावतो याविषयीही अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रचंड उत्सुकता आहे. भाजप व त्यांच्या मित्र पक्षांची मंगळवारी नागपुरात रात्री उशीरापर्यंत या संदर्भात बैठक सुरू होती व पदांच्या वाटणीवर कोणताही निर्णय उशीरापर्यंत झालेला नव्हता, अशी माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

सभापतिपदावरून राष्ट्रवादीत फुटीची दाट शक्यता
पाच सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सभापती पदावरून प्रचंड वाद आहे. माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम हलगेकर यांना सभापती पद मिळण्याची शक्यता असल्याने पक्षाचे ज्येष्ठ जि.प. सदस्य जगन्नाथ पाटील बोरकुटे नाराज आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्यामुळेच पक्षाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी जाहीर व्हिप नोटीस काढण्यात आला होता. सभापती पदाच्या निवडणुकीसाठी व्हिप जारी करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिलाच पक्ष ठरला आहे.

Web Title: How many times will the BJP chairperson?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.