साहेब... महागाई वाढली; दीड लाखांत घर बांधायचे कसे? प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी पुरेसा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 04:20 PM2024-09-28T16:20:02+5:302024-09-28T16:21:02+5:30

अनुदान वाढवा : कोरची तालुक्यात १ हजार ५० घरे मंजूर

How to build a house in one and a half lakh? Funding of Pradhan Mantri Awas Yojana is not enough | साहेब... महागाई वाढली; दीड लाखांत घर बांधायचे कसे? प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी पुरेसा नाही

How to build a house in one and a half lakh? Funding of Pradhan Mantri Awas Yojana is not enough

लोकमत न्यूज नेटवर्क 
कोरची :
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोरची तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमधील १ हजार ५० तर नगरपंचायतमधील ७१ लाभार्थीना घरकुल मंजूर झाले आहे. शासनाने ग्रामपंचायत स्तरातील प्रत्येक घरकुल लाभार्थीला २६९ स्क्वेअर फुटमध्ये इमारत यासह शौचालय बांधकाम करणे आहे. यासाठी १ लाख ५० हजार रुपये निधी जातो. नगरपंचायतमधील लाभार्थीला ३३० स्क्वेअर फुटमध्ये इमारत यासह शौचालय बांधकाम २ लाख ५० हजार रुपयांमध्ये करणे आहे; परंतु महागाईमुळे दीड व अडीच लाखांच्या निधीमध्ये साहेब घर बांधून होईल काय? असा प्रश्न घरकुलधारकांनी उपस्थित केला आहे.


दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे इमारत बांधकामातील रेती, गिट्टी, सिमेंट, सळाख, विटा अशा वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सध्या कोरची तालुक्यामध्ये महसूल विभागाच्या नियोजनात रेती घाट नाही. जिल्हा शासनाच्या वतीने प्रत्येक घरकुलधारकाला पाच ब्रास रेती मोफत दिली जात आहे; परंतु एवढ्याच रेतीत फक्त पायऱ्यापर्यंतच बांधकाम होत आहे. परिणामी कुरखेडा तालुक्यातून रेती आणावी लागते. त्यासाठी खर्च अधिक असल्याने लाभार्थी छोट्या नाल्यांमधील रेती उपसा करतात. 


काही ट्रॅक्टर मालक रेती पुरवतात परंतु महसूल विभागाकडून अशा ट्रॅक्टर मालकांवर प्रत्येकी १ लाख १८ हजार रुपयांचे दंड ठोठावणे सुरू केले आहे. घरकुलासाठी रेतीच मिळत नसल्याने अनेक लाभार्थीचे घरकुल बांधकाम अर्धवट राहिले असल्याचे दिसून येत आहे. 


नगर पंचायत क्षेत्रातही घरकुल
तालुक्यातील २९ ग्रामपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर १ हजार ५० लाभार्थीपैकी ५७७ घरकुलधारकांना पहिला हप्ता मिळाला आहे. पावसाळा संपल्यानंतर घर बांधकामांना सुरुवात होईल. सध्या नगरपंचायत अंतर्गत ७१ लाभार्थी असून १५ लाभार्थीचे घरकुल बांधकाम पूर्ण झाले आहे. ५६ लाभार्थी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.


काय म्हणतात घरकुल लाभार्थी 
"मला शेवटच्या हप्त्याचा २० हजार रुपयांचा चेक मिळाला नाही. माझे • घरकुलाचे बांधकाम अपूर्णच आहे. पैसे केव्हा मिळतील याची वाट बघत आहे. शासनाने घरकुलाचे पैसे द्यावेत." 
- जैनकुमारी चंद्रकिशन बागडेरिया, घरकुल लाभार्थी रा. कोचीनारा.


"घराचे बांधकाम मी पूर्ण केले आहे; परंतु त्यापूर्वी नगरपंचायतच्या चकरा मारून मी कंटाळली आहे. अजूनही ९० हजार रूपये मिळणे शिल्लक राहले आहे." 
-अहिल्याबाई सांडील, घरकुल लाभार्थी कोरची


"शासनाने पीएम आवास योजनेतून लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. या अनुदानामध्ये स्वतः ही पैसे खर्च करून घर बांधणे आहे. पूर्ण घर बांधण्यास अनुदान शासन देत नाही. केंद्र शासनाकडील निधी अजूनही आलेला नाही. त्यामुळे घरकुल धारकांचे हप्ते बाकी आहेत." 
- धम्मदीप साखरे, घरकुल अभियंता, नगरपंचायत कोरची

Web Title: How to build a house in one and a half lakh? Funding of Pradhan Mantri Awas Yojana is not enough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.