वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसेे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:24 AM2021-07-20T04:24:54+5:302021-07-20T04:24:54+5:30
गडचिराेली : शहरातील चामाेर्शी मार्ग एका बाजूने खाेदून ठेवला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी एकच बाजू उपलब्ध आहे. या मार्गावरून चारचाकी, ...
गडचिराेली : शहरातील चामाेर्शी मार्ग एका बाजूने खाेदून ठेवला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी एकच बाजू उपलब्ध आहे. या मार्गावरून चारचाकी, दुचाकी, ट्रेलर, ट्रक, ट्रॅक्टर, एसटी व इतर मालवाहू वाहनांची रात्रंदिवस वर्दळ राहते. अशातच मार्गाच्या बाजूला दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. दुकानदारांचे ग्राहक रस्त्यावरच चारचाकी, दुचाकी वाहने ठेवतात. अशा परिस्थितीत या मार्गाने पायी कसे चालावे, असा प्रश्न पायी चालणाऱ्या व्यक्तींना पडला आहे.
वर्षभरापूर्वी गडचिराेली शहरातून चामाेर्शी मार्गाच्या सिमेंट काॅंंक्रिटीकरणाला सुरूवात झाली. कंत्राटदाराने एक बाजू बनवून ठेवली आहे. दुसऱ्या बाजूचे काम मागील आठ महिन्यांपासून रखडले आहे. आठ महिन्यांपासून मार्ग खाेदून ठेवला असल्याने या ठिकाणी माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बाजूच्या नागरिकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गडचिराेली शहरातील हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. सर्वच वाहने एका बाजूच्या मार्गाने जात असल्याने वाहनांची गर्दी हाेऊन वाहतूक काेंडी हाेते. पायी चालणाऱ्या व्यक्तींना तर मार्गच शिल्लक राहत नाही. जीव धाेक्यात घालून मार्गाच्या बाजूने जावे लागते. अशातच मागून किंवा पुढून एखादा वाहनधारक ठाेकून अपघात करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स....
ग्राहकांची वाहने रस्त्यावर
दुकानदारांनी रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनांना पार्किंगसाठी जागाच शिल्लक राहिली नाही. परिणामी दुकानांमध्ये येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी ठेवतात. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत आहे.
बाॅक्स...
हजाराे वाहनांची वर्दळ
चामाेर्शी मार्गावर शाळा, महाविद्यालये, दुकाने, निमशासकीय व खासगी कार्यालये आहेत. तसेच शहरातील २५ टक्के वस्तीमध्ये या मार्गाने प्रवेश करता येते. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. दरदिवशी हजाराे वाहने रस्त्यावरून ये-जा करतात. सध्या काेराेनामुळे निर्बंध असले तरी या मार्गावरील वर्दळ कमी झाली नाही.
बाॅक्स..
बाजूचे नागरिक त्रस्त
ज्या बाजूने रस्ता खाेदून ठेवला आहे, त्याच्या बाजूला अनेक घरे आहेत. आठ महिन्यांपूर्वी रस्ता खाेदला. मात्र बांधकाम अजूनही केले नाही. आता मुरूम पसरविण्याचे काम सुरू आहे. तेही अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे वास्तव्याने राहत असलेल्या नागरिकांचे माेठे हाल आहेत. घरापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकत नसल्याने ही वाहने दुसऱ्याच्या घरी ठेवावी लागत आहेत.
काेट...
पायी चालायला वाटते भीती
कामात एवढी दिरंगाई करणारा कंत्राटदार अजूनपर्यंत आपण बघितला नाही. सहा महिन्यांपासून रस्ता खाेदून ठेवला आहे. मात्र काम अतिशय संथगतीने सुरू आहे. सदर कंत्राटदाराची काम करण्याची इच्छा नसेल तर त्याच्याकडून काम काढून ते दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यात यावे. गडचिराेली शहरातील नागरिक शांत आहेत. याचा गैरफायदा कंत्राटदार घेत आहे. विशेष म्हणजे लाेकप्रतिनिधीसुद्धा शांत आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- सुनील किलनाके, नागरिक