शेतातील कचरा जाळल्यास सुपीकता कशी टिकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 02:09 PM2024-05-24T14:09:44+5:302024-05-24T14:10:10+5:30
कृषी विभागाचा सल्ला : जाळपोळीमुळे नत्राची मात्रा होते कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेती कचरामुक्त ठेवण्याच्या नावाखाली शेतीतील जुन्या पिकाची धसकटे, तणस, पालापाचोळा शेतात जाळून टाकला जातो. यामुळे कचरा तर नष्ट होतोच शिवाय शेतातील धसकटे जाळल्याने शेतीची सुपीकता वाढते, असा गैरसमज आहे. तणस, धसकटे जाळल्याने शेतीतील सुपीकता नष्ट होते. शेतकऱ्यांनी शेतात धसकटे, पालापाचोळा जाळू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
शेतात रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खताची मात्रा वाढवणे आवश्यक असताना शेतकरी गवतवर्गीय पालापाचोळा, गहू, धान पिकाचे धसकट जाळून टाकतात. त्यामुळे जमिनीतील नत्राची मात्रा कमी होते. स्वच्छ दिसणारे शेत म्हणजे सुपीक शेत नाही. जमिनीतील गवतवर्गीय पालापाचोळा, पिकाची धसकटे जाळून न टाकता ती नांगरणीत जमिनीत मुरवल्याने त्यापासून सेंद्रिय खताची मात्रा वाढते व उत्पन्नाची पातळीसुद्धा वाढते. सेंद्रिय खतामधून जमिनीला लागणारे नत्र, स्फुरद, पालाश ही तिन्ही अन्नद्रव्य मिळतात. शेणखत, कंपोस्ट खत, जनावराचे शेणखत, मानवी मल, कोंबड्याची विष्ठा, भुईमुगाची पेंड, कडुनिंबाचा पाला हे सर्व घटक शेतीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते निर्माण करतात; पण शेतकरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात व शेतात सेंद्रिय खताची मात्रा मोठ्या प्रमाणात वापरत नसल्याने उत्पन्नावर परिणाम होतो.
राज्य सरकारची डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय मिशन आणि केंद्र सरकारची नैसर्गिक शेती मिशन या दोन महत्त्वाच्या योजना या खरीप हंगामात राबविल्या जाणार आहेत. शेतीतील सेंद्रिय खताची मात्रा कशी वाढवता येईल व शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढविण्यासाठी व रासायनिक खतांचा होणारा परिणाम, वारेमाप खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागामार्फत या योजना शेतकरी गटामार्फत राबविल्या जाणार आहेत.
- नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी
ज्या काळात रासायनिक खते नव्हती आणि असली तरी त्याचे प्रमाण कमी होते. तेव्हा शेतकरी पिकाचे अवशेष, हिरवळीचे खत, शेतातील तण आदी कुजवून खत तयार करत असत. यामुळे शेताचा पोत टिकून असायचा. जमिनीची सुपीकता अनेक वर्ष कायम असायची. मात्र, रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे.
- केशव गेडाम, शेतकरी, वैरागड