वसतिगृहातील मुलामुलींच्या मानवी अधिकारांचे हनन
By admin | Published: July 24, 2016 01:31 AM2016-07-24T01:31:04+5:302016-07-24T01:31:04+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत गडचिरोली येथील चारही वसतिगृहात जुन्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.
आविसंचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांचा आरोप : प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून दबंगगिरी
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत गडचिरोली येथील चारही वसतिगृहात जुन्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सर्व सुरळीत सुरू असताना अचानक प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या सूचनेवरून लांजेडा येथील वसतिगृहाच्या अधीक्षिकेने व काही कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास १४ मुलींना वसतिगृहाबाहेर काढले. प्रवेश प्रक्रिया पूर्ण व्हायची असल्याचे कारण सांगून आदिवासी मुलामुलींच्या अधिकारांचे प्रकल्प कार्यालयाकडून हनन केले जात आहे, असा आरोप करीत या बाबीस जबाबदार असलेल्या प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, सहायक प्रकल्प अधिकारी कुलकर्णी, विकास राचेलवार व वसतिगृहाच्या गृहपाल स्वाती पांडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी क्रांती केरामी, प्रकाश मट्टामी, देवत्री टोहलिया, मुकेश नरोटे, विद्या सिडाम, यास्मिनी भोयर आदी उपस्थित होते. याप्रसंगी क्रांती केरामी व प्रकाश मट्टामी म्हणाले, प्रकल्प कार्यालयाच्या वतीने येथील आदिवासी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहातील मेस बंद करण्यात आल्यामुळे शुक्रवारी सायंकाळचे व शनिवारी सकाळचे जेवन मुलामुलींना मिळाले नाही. त्यामुळे वसतिगृहातील अनेक मुली शनिवारी स्वगावी परतल्या. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनावर आहे. मात्र येथील अधिकारी विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करीत आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेऊन शिकणे सुरू केले. मात्र वसतिगृह बंद करण्यात आल्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांची प्रचंड अडचण झाली आहे. आजपर्यंत वसतिगृहाबाबत असा प्रकार घडला नाही, असे केरामी यांनी सांगितले. लांजेडा येथील वसतिगृहातील मुलींना जबरदस्तीने सुटीचा अर्ज लिहून घेऊन त्यांना बाहेर काढण्यात आले. या संदर्भात आम्ही प्रकल्प अधिकारी दिवेगावकर यांची भेट घेतली. मात्र मुलामुलींना वसतिगृहात ठेवण्यास त्यांनी नकार दिला, असे केरामी यावेळी म्हणाले.
गडचिरोली प्रकल्प कार्यालयाकडून गेल्या अनेक दिवसांपासून दबंगगिरी सुरू आहे. विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा काढणार, असेही केरामी म्हणाले. (प्रतिनिधी)
मंगळवारपासून वसतिगृह नियमित सुरू होणार - कौस्तुभ दिवेगावकर
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत गडचिरोली येथे आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहांमध्ये नव्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नाही. तसेच जुन्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर मंगळवारपासून शहरातील सर्व वसतिगृह नियमित सुरू होणार, अशी माहिती गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
वसतिगृहातील अनेक विद्यार्थी एटीकेटी मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. जुने विद्यार्थी असले तरी त्यांना आपले प्रवेश वसतिगृहात नियमानुसार करणे आवश्यक आहे. सध्या येथील मुलींच्या वसतिगृहात सुरक्षागार्ड नियुक्त करण्यात आले नाही. तसेच मेस सुरू नाही. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर दोन्ही प्रश्नांबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला असून त्यांचे मार्गदर्शन मागविले आहे. शिवाय या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. वसतिगृहातील कोणत्याही मुलींना प्रशासनातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने बाहेर काढले नाही. मेस, सुरक्षारक्षक व वसतिगृहातील इतर वार्षिक खर्च कोटींच्या घरात आहे. सदर खर्चास शासनाकडून मंजूरी न मिळाल्याने वसतिगृह सुरू करणे अडचणीचे झाले. आपण स्थानिक स्तरावर प्रयत्न करून मंजुरी मिळवून घेणार व वसतिगृह विद्यार्थ्यांचा प्रश्न निकाली काढणार, असे प्रकल्प अधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले.