नर्सिंगच्या माध्यमातून मानवसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 08:41 PM2018-01-08T20:41:37+5:302018-01-08T20:42:39+5:30
नर्सिंगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच रूग्णांची सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त होते.
आॅनलाईन लोकमत
देसाईगंज : नर्सिंगच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच रूग्णांची सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त होते. त्यामुळे नर्सिंग हे मानवसेवेचे महत्त्वाचे साधन आहे. दगडाच्या माध्यमातून रस्ते, इमारत यासारखी विकास कामे करता येतात. मात्र हाच दगड डोके फोडण्याकरिताही वापरला जातो. एकंदरीतच आपल्याकडील ज्ञानाचा चांगल्या कामासाठी वापर करावा, असे प्रतिपादन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज स्टुडंट नर्सेस असोसिएशनतर्फे महाविद्यालयात ओपन टॅलेंट कॉन्टेस्ट (नृत्य स्पर्धा) स्पर्धेचे आयोजन शनिवारी करण्यात आले. या स्पर्धेत २७ संघांनी सहभाग घेतला होता. विजयी संघांना आ. विजय वडेट्टीवार यांच्या बक्षीस हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सीआरपीएफचे कमांडंट त्रिपाठी, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, अॅड. संजय गुरू आदी मान्यवर उपस्थित होते.
कमांडंट त्रिपाठी यांनी विद्यार्थिनींमधील कलागुणांचे कौतुक केले. जेसा मोटवानी यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात विजय वडेट्टीवार यांचा मोलाचा वाटा आहे. देसाईगंज येथे उद्योग व शैक्षणिक संस्थांसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे या ठिकाणी शैक्षणिक संस्था व उद्योग निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे मार्गदर्शन केले. डॉ. प्रमोद साळवे यांनी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन केले. संचालन पुरूषोत्तम भागडकर तर आभार दिशांकी भागडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निता बावणे, नेहा तिवारी, मेघा नागपूरकर, मृणाल बुद्धे, रोशन करडे, नीलिमा अंबादे, प्रियंका निमगडे, रेश्मा चिपेली, प्राजक्ता भांडेकर, पल्लवी लोंढे, शिल्पा तलांडे, विनोद दुर्गे, स्नेहा गेडाम, सोनाली कुंजाम, तेजस्वीनी लाकडे, सुनीता पुसाली, प्राची नारनवरे, पूजा कुमरे, ओजस्वीनी नरताम, सुश्मिता रॉय, काजल उडाण, काटकुरवार, अश्विनी अंबादे, अश्विनी पदा, प्रिया आत्राम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
विजेत्यांचा गौरव
याप्रसंगी घेण्यात आलेल्या समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक पार्वती मतिमंद विद्यालय देसाईगंज, द्वितीय सिमिकॉर गु्रप देसाईगंज तर तृतीय पारितोषिक डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजच्या जय महाकाली जीएनएम तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनींनी पटकाविला. विजेत्यांचा गौरव करण्यात आला.