कुणबी समाजालाही हवा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:42 AM2018-12-08T00:42:56+5:302018-12-08T00:43:21+5:30
लोकसंख्येच्या तुलनेत कुणबी समाजापेक्षा कमी असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मिळाले, पण बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला त्या आरक्षणाचा वाटा मिळाला नसल्यामुळे या समाजातील बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसंख्येच्या तुलनेत कुणबी समाजापेक्षा कमी असलेल्या मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण मिळाले, पण बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला त्या आरक्षणाचा वाटा मिळाला नसल्यामुळे या समाजातील बेरोजगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या १६ टक्के आरक्षणात आम्हालाही वाटा द्या, अशी मागणी ठिकठिकाणी जोर धरत आहे.
यासंदर्भात कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनीही एका पत्रकातून या मागणीला उचलून धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देऊन त्या समाजाला न्याय दिला. या आरक्षणासाठी ५२ आंदोलने व ४० जणांना बळी जावे लागले. परंतू मराठ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करीत असताना कुणबी समाजाला सोबत घेऊनच आंदोलने केली. मराठा नेते कुणबी आणि मराठा आम्ही एकच आहोत, आमच्यात रोटी-बेटीचे व्यवहार चालतात म्हणून आम्हाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करून घ्यावा, अशी मागणी करीत होते. परंतू ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी विरोध केल्याने सरकारने त्यांना एसबीसी प्रवर्गात समावेश करून एकूण ५१ टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून तामिळनाडूच्या धर्तीवर १६ टक्के आरक्षण दिले. परंतू जातीनिहाय जनगणना झालेली नसताना मराठ्यांची लोकसंख्या महाराष्ट्रात ३२ टक्के ठरविणे चुकीचे आहे, असे ठाम मत भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात १०० टक्क्यांपैकी ५२ टक्के ओबीसी, एससी-एसटी २ टक्के आणि मुस्लिम, ब्राह्मण व तत्सम खुल्या प्रवर्गातील जाती पकडून १०० टक्के लोकसंख्या होते. त्यात ३२ टक्के मराठा समाज दाखविणे चुकीचे असल्याचा आरोप वाघरे यांनी केला.
मराठा समाजाकडून संपूर्ण राज्यात आंदोलने केली जात असताना मराठवाड्यात सकल मराठा मोर्चा, तर कोकण, खान्देश आणि विदर्भात मराठा-कुणबी मोर्चा अशा पद्धतीचे होर्डिंग लावून या आंदोलनात कुणबी समाजाला समाविष्ठ करून घेण्यात आले होते. मग आता आरक्षणात कुणबी समाजाला वाटा का नाही? असा सवाल कुणबी समाजातील युवकांकडून केला जात आहे.
राज्य सरकार सध्या नोकरभरतीचा गवगवा करीत असल्यामुळे अनेक बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतू त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळेल पण आपल्याला नाही, या कल्पनेने कुणबी समाजातील बेरोजगार युवक अस्वस्थ होत आहेत.
ही तर फसवणूक
आरक्षणासाठी मराठा समाज खरोखरच पात्र आहे का? आणि या समाजाची लोकसंख्या किती हे तपासण्यासाठी तत्कालीन सरकारने राणे समिती गठीत केली होती. परंतू त्या समितीने गडचिरोली जिल्ह्यात मराठा समाजाची १८ हजार कुटुंब असल्याची माहिती प्रशासनामार्फत शासनाला दिली. वास्तविक विदर्भातील जिल्ह्यांत राहणाऱ्या कुणबी समाजाची गणना मराठा समाजात करून राणे समितीने कुणबी समाजाची फसवणूक केली. महाराष्ट्रात होणाऱ्या मेगाभरतीत कुणबी समाजाला मराठा आरक्षणात वाटा द्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे यांनी केली.