शेकडो संगणक परिचालक जिल्हा परिषदेवर धडकले
By admin | Published: October 21, 2015 01:26 AM2015-10-21T01:26:56+5:302015-10-21T01:26:56+5:30
संग्राम महाआॅनलाईन अंतर्गत जिल्ह्याच्या बाराही पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत संगणक परिचालकांचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे मानधन थकले आहे.
सहा महिन्यांचे मानधन थकीत : शंभूविधी गेडामला घातला घेराव
गडचिरोली : संग्राम महाआॅनलाईन अंतर्गत जिल्ह्याच्या बाराही पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत संगणक परिचालकांचे गेल्या सहा महिन्यांपासूनचे मानधन थकले आहे. जिल्हा समन्वयक व जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मानधन अदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १५ दिवसांचा कालावधी उलटूनही संगणक परिचालकांना मानधन मिळाले नाही. अखेर संतप्त शेकडो संगणक परिचालकांनी मानधन मिळण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेवर धडक देऊन जिल्हा समन्वयक शंभूविधी गेडाम यांना पंचायत विभागात घेराव घातला.
यावेळी संगणक परिचालक संघटना जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष नाहीद पठाण, सचिव संदीप बुरमवार, कोरची तालुकाध्यक्ष भुमेश्वर शेंडे, पवित्र मंडल साखर झाडे, राहूल मेश्राम, विजय मिसार आदीसह शेकडो संगणक परिचालक उपस्थित होते. गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत बाराही तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये महाआॅनलाइन संग्राम अंतर्गत एकूण ४६० संगणक परिचालक कार्यरत आहेत. या परिचालकांचे मानधन जि.प.च्या पंचायत विभागामधून महाआॅनलाईनचे जिल्हा समन्वयक शंभूविधी गेडाम यांच्या अधिनस्त करण्यात येते. जिल्ह्यातील ४६० संगणक परिचालकांचे मागील सहा महिन्यांचे मानधन प्रलंबित आहे. (स्थानिक प्रतिनिधी)