बदलीसाठी शेकडो कर्मचाऱ्यांची उसळली गर्दी
By admin | Published: May 8, 2016 01:12 AM2016-05-08T01:12:47+5:302016-05-08T01:12:47+5:30
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना शनिवारपासून सुरूवात झाली. शनिवारी आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या : रात्री उशिरापर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरू
गडचिरोली : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना शनिवारपासून सुरूवात झाली. शनिवारी आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदल्यांसाठी शेकडो कर्मचारी जिल्हा परिषद कार्यालयात दाखल झाले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची एकच गर्दी उसळली होती.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट, मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्यासह बाराही तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहायक महिला या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. एएनएम व एमपीडब्ल्यू यांचे समायोजन करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे नेमक्या किती आरोग्य कर्मचाऱ्यांची बदल्या झाल्या हे कळले नाही. (नगर प्रतिनिधी)
बदल्यांबाबत शेकडो कर्मचारी अनभिज्ञ
हजारो कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात असल्याने याबाबतची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याला व्हावी, यासाठी प्रसिध्दी माध्यमांच्याद्वारे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच जिल्हा परिषद प्रशासनाने बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले नाही. त्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना बदल्यांविषयची माहितीच झाली नाही. परिणामी ऐन वेळेवर गोंधळ उडाला असल्याची प्रतिक्रिया आरोग्य कर्मचाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.