चार नगरसेवकांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
By admin | Published: October 3, 2016 02:09 AM2016-10-03T02:09:55+5:302016-10-03T02:09:55+5:30
गडचिरोली नगरपालिकेच्या चार नगरसेवकांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रविवारी भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर : शहरात राजकीय उलथापालथ
गडचिरोली : गडचिरोली नगरपालिकेच्या चार नगरसेवकांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रविवारी भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. त्यामुळे भाजप प्रवेशित नगरसेवकांची संख्या आता पाच झाली आहे. यापूर्वी नगरसेवक संजय मेश्राम यांनी भाजपात प्रवेश केला होता.
रविवारी माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक आनंद श्रुंगारपवार, माजी नगराध्यक्ष भूपेश कुळमेथे, नगरसेवक अजय भांडेकर, पूनम भांडेकर या चौघांनी स्थानिक शासकीय विश्रामगृहात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय उलथापालथ झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचे पडसाद नक्कीच उमटणार आहेत. दरम्यान या चौघांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला गडचिरोली शहरात मोठी बळकटी मिळाली असल्याची भावना खासदार अशोक नेते यांनी यावेळी व्यक्त केली.
पक्षप्रवेशाप्रसंगी आनंद श्रुंगारपवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारचे काम अतिशय चांगल्या पध्दतीने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामगिरीही सरस आहे. देश व राज्य विकासात भरीव कार्य करीत असलेल्या भाजप सरकारच्या माध्यमातून गडचिरोली नगराचा विकास साध्य करण्यासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक आनंद श्रुंगारपवार व त्यांचे समर्थक नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र मुहूर्त गवसला नव्हता. दरम्यान खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर रविवारी या चौघांनी पक्षात प्रवेश केला. यापूर्वी संजय मेश्राम यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता भाजप प्रवेशित नगरसेवकांची संख्या पाच झाली आहे. पक्ष प्रवेशाच्यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, रमेश भूरसे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम, गजानन येनगंधलवार, रेखा डोळस, हेमंत राठी, नंदू काबरा, प्रकाश अर्जूनवार, संजय बारापात्रे, डॉ. भारत खटी, भाजयुमोचे स्वप्नील वरघंटे, पराग पोरेड्डीवार, अनिल करपे, अनिल कुनघाडकर, विनोद देवोजवार, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)