Corona Virus in Gadchiroli; ‘त्या’ ३५ मजुरांचा शेकडो किमीचा पायीच प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 07:28 PM2020-04-01T19:28:52+5:302020-04-01T19:30:10+5:30
तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्ह्याच्या गोंगली येथील ३५ पुरूष व महिला मजुरांनी डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन भर उन्हात तेलंगणा ते गोंगली (जि.गोंदिया) असा शेकडो किमीचा पायी प्रवास केल्याची बाब २९ मार्चला निदर्शनास आली.
महेंद्र रामटेके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर वाहतुकीची साधने बंद झाली. त्यामुळे कामाच्या शोधात गेलेले मजूर त्याच ठिकाणी अडकल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेलेले गोंदिया जिल्ह्याच्या गोंगली येथील ३५ पुरूष व महिला मजुरांनी डोक्यावर सामानाचे गाठोडे घेऊन भर उन्हात तेलंगणा ते गोंगली (जि.गोंदिया) असा शेकडो किमीचा पायी प्रवास केल्याची बाब २९ मार्चला निदर्शनास आली.
प्रवासादरम्यान आरमोरी येथे पोहोचल्यानंतर युवारंगच्या सदस्यांनी दिलेला अल्पोपहार घेऊन ते पुन्हा पुढच्या प्रवासाला निघाले. गोंदिया जिल्ह्यातील अनेक मजूर आपले कुटुंब घेऊन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेले. गोंदियाच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील गोंगली येथील ३५ मजूर मिरची तोडण्यासाठी तेलंगणा राज्यात गेले होते. मिरची तोडाईचे काम सुरू असताना जगात कोरोनाचे संकट घोंगवायला सुरूवात झाली आणि हे संकट टाळण्यासाठी खबरदारी म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी मिरची तोडाईचा रोजगार बंद झाला. हाताला मिळणारे कामही थांबले. लॉकडाऊनमुळे राज्यातील प्रवासीह वाहतूकही बंद झाली. १४ एप्रिलपर्यंत तीन आठवडे संचारबंदी असल्याने एवढे दिवस रिकामे बसून खाण्यापेक्षा आपल्या गावाला गेलेले बर, असा निर्णय घेऊन ३५ मजूर तेलंगणा राज्यातून २५ मार्चला पायीच या प्रवासाला निघाले. डोक्यावर सामानाचे गाठोळे आणि कडाक्याच्या उन्हात तेलंगणा ते गोंदिया असा प्रवास सुरू झाला. दिवसभर प्रवास करायचा आणि सायंकाळ झाली तर मुक्काम करायचा. पुन्हा सकाळी प्रवासाला सुरूवात करायची, अशी त्यांची दिनचर्या.
तेलंगणा राज्यातून पायी निघालेले हे ३५ मजूर शेकडो किमीचा प्रवास करीत २९ मार्चला आरमोरीत पोहोचले. ही बाब युवारंगच्या कार्यकर्त्यांना कळली. त्यांनी या मजुरांसाठी पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केली. थोडावेळ थांबल्यानंतर त्यांनी पुन्हा गोंदियासाठी प्रवासाला सुरूवात केली. ‘त्या’ ३५ मजुरांचा शेकडो किमीचा पायीचा प्रवास थक्क करणारा होता.
कोरोनाच्या संकटामुळे रोजीरोटीच्या शोेधात गेलेल्या मजुरांवर पायी प्रवास करण्याची नामुष्की ओढावली. अद्यापही चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणात अडकून पडले आहेत.