आगीमुळे शेकडो हेक्टवरील कोट्यवधींची वनसंपदा नष्ट
By admin | Published: March 17, 2017 01:19 AM2017-03-17T01:19:04+5:302017-03-17T01:19:04+5:30
मागील आठ दिवसांत आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी, पिसेवडधा, वैरागड, गडचिरोली तालुक्यातील पोर्ला
वन विभागाचे होत आहे दुर्लक्ष : वैरागड, पिसेवडधा, डोंगरतमाशी तसेच कुरखेडा व कोरची तालुक्यातील जंगलाला आग
वैरागड : मागील आठ दिवसांत आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी, पिसेवडधा, वैरागड, गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वन परिक्षेत्रातील मोहटोला, लोहारा, नरचुलीच्या जंगलात आग लागली असून या आगीत कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होत आहे. मात्र वन विभागाची यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसून येत आहे.
मार्च महिन्याला सुरूवात होताच जंगलांना आगी लागण्यास सुरूवात होते. याचा अनुभव वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आहे. यावर्षी वन विभागाने जंगलातील आगी थांबविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आरमोरी, कुरखेडा, पोर्ला वन परिक्षेत्रातील शेकडो हेक्टर जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी, पिसेवडधा, वैरागड येथे कृत्रित रोपवाटिका आहेत. या रोपवाटीकेत वनवा लागला आहे. कुरखेडा, कोरची तालुक्यातील जंगल आगीत नष्ट झाले आहे. पोर्ला वन परिक्षेत्रातील मोहटोला, लोहारा, नरचुलीपर्यंतच्या जंगलाला आग लागली आहे. आग विझविण्यासाठी कोणती उपाययोजना वन विभाग करताना दिसत नाही. ज्या ठिकाणी खोटे मजूर दाखवून आर्थिक चिरीमिरी मिळते. त्या ठिकाणी फायरलाईन जाळण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
ज्या वन क्षेत्रात वनवे लागतील. त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला जबाबदार धरून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. शासन कोट्यवधी रूपये मंजूर करते व ते खर्चही होतात. मात्र जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण तसूभरही कमी झाले नाही. आग लागण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीच कारवाई केली जात नसल्याने शासनाचा पैसा वन विभागाचे अधिकारी केवळ लाटत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. वन विभागाने प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यावर विशिष्ट भूभागाची जबाबदारी निश्चित करावी व त्या भूभागावर आग लागल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करावी, असे झाल्यास वन विभागाचे कर्मचारी अधिक दक्ष राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)