दोनच डॉक्टरांवर शेकडो रुग्णांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 09:40 PM2017-09-02T21:40:39+5:302017-09-02T21:41:10+5:30
कोरची येथील ग्रामीण रूग्णालयात चार डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी दोनच डॉक्टर कार्यरत आहे. एकही पूर्णवेळ परिचारीका उपलब्ध नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची येथील ग्रामीण रूग्णालयात चार डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी दोनच डॉक्टर कार्यरत आहे. एकही पूर्णवेळ परिचारीका उपलब्ध नाही. इतरही आरोग्य कर्मचाºयांची व तंत्रज्ञानाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेला आरोग्य सेवा मिळण्यास अडचण होत आहे.
छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या कोरची तालुक्याचे गडचिरोली पासूनचे अंतर १०० किमी आहे. त्यामुळे प्रत्येकच नागरिक उपचरासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात येऊ शकत नाही. कोरची येथे ग्रामीण रूग्णालय आहे. मात्र या ठिकाणी आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांचे अनेक पदे रिक्त आहेत. हीच स्थिती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही आहे. कोरची तालुक्यात व्याप, लोकसंख्या व गडचिरोलीपासूनचे अंतर लक्षात घेता, ग्रामीण रूग्णालयातील पूर्ण पदे भरणे आवश्यक आहे. मात्र डॉक्टरांच्या चार पदांपैकी दोन पदे रिक्त आहेत. रूग्णालयाचा कारभार दोन डॉक्टरवर चालविला जात आहे. तालुक्यातील बहुतांश रूग्ण तालुकास्थळी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र रिक्त पदांमुळे त्यांच्यावर योग्य वेळी उपचार होत नाही. परिणामी बहुतांश रूग्णांना कुरखेडा किंवा गडचिरोली रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो. रूग्णालयात लाखो रूपये किमतीची एक्स-रे मशीन आहे. सदर मशीन चालविण्यासाठी तंत्रज्ञ नाही. त्यामुळे मशीन धूळखात पडून आहे. कोरची तालुक्यातील लोकसंख्या ६० हजारापेक्षा अधिक आहे. तालुक्यात एक ग्रामीण रूग्णालय, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन प्राथमिक आरोग्य पथक आहेत. या ठिकाणी केवळ चार डॉक्टर कार्यरत आहेत. कोरची रूग्णालयात बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ व इतर तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी कोरची तालुक्यात मलेरियाची साथ पसरली होती. त्यावेळीही रूग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्याने रूग्णांचे हाल होते. अधूनमधून या तालुक्यात साथीचे रोग पसरत राहतात. मात्र उपचारासाठी मनुष्यबळ नसल्याने येथील रूग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला दिला जातो. आदिवासी नागरिक गडचिरोली सारख्या शहरात येण्यास तयार होत नाही. कित्येक रूग्ण गडचिरोली येथे उपचार घेण्यापेक्षा घरी परत जातात.
आरोग्य केंद्रातही रिक्त पदांचा डोंगर
कोरची तालुक्यात बोटेकसा व कोटगुल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कोटगुला एक डॉक्टर कार्यरत आहे. बोटेकसा येथे एकही डॉक्टर नाही. मसेली व बेतकाठी येथे प्राथमिक आरोग्य पथक असून मसेली येथे डॉ. धरमठोक व बेतकाठी येथे डॉ. तलमले कार्यरत आहेत. डॉ. तलमले यांना ग्रामीण रूग्णालय कोरची येथेही प्रतिनियुक्ती दिली असल्याने ते कोरची येथे काम पाहतात. नवेझरी, कोटरा व कोहका येथे नवसंजीवनी योजनेंतर्गत दवाखाने असून या ठिकाणी मानसेवी डॉक्टर नियुक्त आहेत.
कोरची रूग्णालयात डॉक्टर येण्यास तयार नाही. त्यामुळे अधीक्षकाचेही पद रिक्त आहे. बेतकाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. तलमले यांना ग्रामीण रूग्णालयात प्रतीनियुक्ती देण्यात आली आहे. बहुतांश वेळ ते ग्रामीण रूग्णालयातच सेवा देतात.
- डॉ. सचिन कावडकर, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय कोरची