रस्त्याच्या कडेला फेकले शेकडो रोपटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:09 PM2019-07-16T23:09:08+5:302019-07-16T23:09:21+5:30
वैरागड-कढोली मार्गाच्या बाजूला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले. रोपटेही आणले. मात्र या रोपट्यांची लागवड न करताच सदर रोपटे रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आले आहेत. यामुळे रोपटे व खड्डे खोदण्याचा खर्च वाया गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : वैरागड-कढोली मार्गाच्या बाजूला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले. रोपटेही आणले. मात्र या रोपट्यांची लागवड न करताच सदर रोपटे रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आले आहेत. यामुळे रोपटे व खड्डे खोदण्याचा खर्च वाया गेला आहे.
१ जुलैपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविली जात आहे. केवळ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नको त्या ठिकाणी खड्डे खोदून वृक्ष लागवडीचा फार्स आटोपला जात आहे. वृक्ष लागवडीनंतर त्याला कठडा केला जात नसल्याने दुसऱ्याच दिवशी किंवा काही वेळातच जनावरे सदर झाड फस्त करीत आहेत.
वैरागड मार्गावर पाठनवाडा ते कराडीदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले. मात्र या खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड केली नाही. रस्त्याच्या बाजूला रोपटे अस्ताव्यस्त पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजले सुद्धा आहेत. खड्डे व वृक्षांचा खर्च वाया गेला आहे. असे प्रकार जिल्हाभरात अनेक ठिकाणी घडले आहेत.
विशेष म्हणजे अगदी मुख्य रस्त्याच्या बाजूला लागवड न करताच रोपटे फेकण्यात आले आहेत. वनविभाग जंगलात लाखो झाडांची लागवड करीत असल्याचे दाखविते. मात्र खरच लागवड होते काय व त्यातील किती वृक्ष जगतात याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लाखो झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. मात्र झाडे न लावताच सदर पैसे परस्पर खर्च केले जात असल्याचा प्रकार नाकारता येत नाही. किती झाडे लावण्यात आली, त्यातील किती झाडे जगली, याचा सर्वेक्षण होणे गरजचे आहे. अन्यथा पुन्हा पुढील १० वर्ष लागवड झाली तरी वृक्षांची संख्या वाढणार नाही.