शेकडो विद्यार्थ्यांनी केली निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2015 01:30 AM2015-08-08T01:30:40+5:302015-08-08T01:30:40+5:30
येथील कॉम्प्लेक्स परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा ग्रंथालयात विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याने अध्यासन करणे कठीण झाले आहे.
जिल्हा ग्रंथालयात गैरसोय : प्रशासनाविरोधात रोष
गडचिरोली : येथील कॉम्प्लेक्स परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिल्हा ग्रंथालयात विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याने अध्यासन करणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नगर पालिकेचे पाणीपुरवठा सभापती संजय मेश्राम यांच्या नेतृत्त्वात ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतून बाहेर पडून ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारावर प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली.
शासनाने लाखो रूपये खर्च करून गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्लेक्स परिसरात प्रशस्त ग्रंथालयाची इमारत उभारली आहे. मात्र या ग्रंथालय कार्यालयात कर्मचाऱ्यांची वागणूक योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास होतो. वाढत्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत खुर्ची, टेबल व आसन व्यवस्था कमी पडत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण निर्माण होते.
ग्रंथालयातील कर्मचारी दुपारी १२ वाजतानंतर ग्रंथविभागाला कुलूप लावून घरी जातात. त्यामुळे दुपारी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत नाहीत. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही विद्यार्थ्यांना न्याय देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शुक्रवारी ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीच्या जिल्हा ग्रंथालयाकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी आकाश कंकलवार, सचिन रामटेके, स्वप्नील संगिडवार, अरविंद पाकमोडे, कुमोद निकोडे, योगीता कुमरे, अर्चना कुलसंगे, सोनाली झोडगे, अस्मिता दुधबळे, लोचन मेश्राम, रजनी शेंडे आदी उपस्थित होते. या संदर्भात जिल्हा ग्रंथालय अधिकारी वि. मू. डांगे यांची बाजू घेण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क केला. तर त्यांनी आपण नागपूर येथे बैठकीला आलो आहे. काय प्रकार झाला याबाबत आता काही सांगता येणार नाही. सोमवारी या संदर्भात सविस्तर माहिती देऊ, असे त्या म्हणाल्या. (स्थानिक प्रतिनिधी)
निर्गम सहायकाचा अभाव
ग्रंथालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके देण्याकरिता निर्गम सहायक आवश्यक आहे. मात्र ग्रंथालयात सदर पद भरण्यात आले नाही. या ग्रंथालयात एकूण सहा पदे मंजूर आहेत. यापैकी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक व शिपाई आदी चार पदे भरण्यात आली असून ती कार्यरत आहेत. पुस्तक वितरणासाठी निर्गम सहायकाचे पद भरण्यात न आल्याने येथील कर्मचारी पुस्तक वितरणाचे काम एकमेकांवर ढकलत असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.