निषेध आंदोलनाला शेकडो शिक्षकांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:27 AM2019-01-16T01:27:58+5:302019-01-16T01:28:20+5:30
उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी तालुकास्तीय क्रीडा संमेलनात शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे वक्तव्य केल्याचा आरोप करून चलाख यांच्यावर कारवाई करावी. त्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे. या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी तालुकास्तीय क्रीडा संमेलनात शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे वक्तव्य केल्याचा आरोप करून चलाख यांच्यावर कारवाई करावी. त्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे. या मागणीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जि.प. अध्यक्ष, शिक्षण मंत्री यांना निवेन पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मारोती चलाख यांची कारकिर्द अतिशय वादग्रस्त आहे. त्यांनी उपशिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शिक्षकांबाबत असंसदीय भाषेचा वापर करून शिक्षकांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कृतीचा निषेध नोंदविण्यासाठी निषेध आंदोलन केले जात आहे. चलाख यांच्यावर कारवाई करून त्यांचे इतरत्र स्थानांतरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारच्या आंदोलनात सर्वच संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक एकत्र येत आंदोलन केले. आंदोलनात सर्वच शिक्षक संघटनांचे जवळपास ५०० पेक्षा अधिक सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे अध्यक्ष धनपाल मिसार, रमेश रामटेके, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे आर. एम. भांडेकर, महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, प्रमोद खांडेकर, जिल्हा परिषद कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र डोहणे, प्रभाकर साखरे, जिल्हा परिषद कास्ट्राईब कल्याण महासंघाचे अध्यक्ष प्रभू वैद्य, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष गुरूदेव नवघडे, महाराष्टÑ राज्य दुर्गम कृती संघटनेचे अध्यक्ष किशोर कुरवटकर, विदर्भ शिक्षक समितीचे अनिल मुलकलवार, लालचंद धाबेकर, यशवंत जांभुळकर, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद बाह्मणवाडे, केंद्र प्रमुख शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष राजू वडपल्लीवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक नरेंद्र कोत्तावार, संचालन रमेश रामटेके तर आभार देवेंद्र लांजेवार, आशिष धात्रक यांनी मानले.