जनावरांसाठी साडेचार लाख लस उपलब्ध
By admin | Published: June 22, 2017 01:37 AM2017-06-22T01:37:14+5:302017-06-22T01:37:14+5:30
पावसाळ्यात प्रामुख्याने बैल व गायींना घटसर्प, एकटांग्या व शेळ्या तसेच कोंबड्यांना विविध प्रकारचे आजार होतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाळ्यात प्रामुख्याने बैल व गायींना घटसर्प, एकटांग्या व शेळ्या तसेच कोंबड्यांना विविध प्रकारचे आजार होतात. या आजारांमुळे जनावर दगावण्याची शक्यता राहते. या रोगांना प्रतिबंध घालण्यासाठी सुमारे ४ लाख ४४ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत.
जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतीबरोबरच शेतकरी पशुुपालनाचाही व्यवसाय करतात. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पशुंचीही संख्या अधिक आहे. पाळीव पशुंमध्ये प्रामुख्याने बैल, गाय, शेळ्या, मेंढ्या, म्हशी यांचा समावेश आहे. पावसाळ्यात या जनावरांना विविध रोगांचा संसर्ग होतो. जनावरांना संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवण्यासाठी पशु संवर्धन विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापुर्वी लसीकरण मोहीम राबविली जाते. पशुसंवर्धन विभागाला शासनाकडून घटसर्प रोगाच्या ८४,००० डोजेस, एकटांग्या ९६,००० डोजेस बकऱ्यांसाठी असलेले पीपीआर ८५,०००डोजेस व कोंबड्या रोगावर प्रतिबंधात्मक असलेले आरडी ही लस १ लाख ७९ हजार ५०० डोजेस उपलब्ध झाल्या आहेत. औषधसाठा ग्रामीण स्तरावर असलेल्या पशु वैद्यकीय रूग्णालयांना पुरविण्यात आला आहे.