शेकडाे गावांना पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:34 AM2021-03-24T04:34:19+5:302021-03-24T04:34:19+5:30
भामरागड : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल अतिदुर्गम भामरागड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये आजही रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आदीसह इतर ...
भामरागड : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल अतिदुर्गम भामरागड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये आजही रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आदीसह इतर मूलभूत सुविधा पोहोचल्याच नाहीत. परिणामी या भागातील नागरिक विविध समस्यांचा सामना करीत अडचणीचे जीणे जगत आहेत.
भामरागड तालुक्याची निर्मिती १९९२ मध्ये झाली. आता २०२१ ला तालुका निर्मितीला २९ वर्षे उलटली आहेत. मात्र विकासाच्या वाटा विस्तारल्याचे दिसून येत नाहीत. भामरागड तालुक्यात माडीया आदिवासी जमातीचे लोक मोठ्या संख्येने निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना नवे वर्ष येवो की जावो याचे काहीही सोयरसुतक नाही. एकीकडे शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. भारत देश प्रगतीच्या वाटेवर आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर वसलेला भामरागड तालुका निर्मितीपासूनच विकासाच्या प्रतीक्षेत आहे. शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून दुर्गम भागातील जनतेपर्यंत विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र यापैकी बऱ्याच योजनांची माहिती भामरागड तालुक्यातील आदिवासी नागरिकांना नसल्याने हे नागरिक शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.