विद्युत सापळ्यात अडकून हरणांसह शिकाऱ्याचीही झाली शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 07:19 PM2018-05-23T19:19:32+5:302018-05-23T19:19:32+5:30
जंगलात अवैैधरित्या शिकार करीत असताना शिकारीसाठी लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन हरणांसह शिका-याचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारच्या पहाटे घडली.
गडचिरोली - आलापल्ली-सिरोंचा मार्गावर मोसम गावाजवळील जंगलात अवैैधरित्या शिकार करीत असताना शिकारीसाठी लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन दोन हरणांसह शिका-याचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारच्या पहाटे घडली.
मृत शिकाºयाचे नाव विलास श्यामराव सडमेक (४०) रा.झिमेला असे असून तो मूळचा व्यंकटापूरचा रहिवासी आहे. आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील वनविकास महामंडळ (एफडीसीएम)च्या जंगलात मुख्य मार्गावरून पूर्वेस १ किमी अंतरावर जंगलात जिवंत विद्युत तारा टाकून शिकार करण्याचा प्रयत्न केला जात होता. मुख्य मार्गावरील रस्त्याच्या पलिकडील ११ केव्ही विद्युत वाहिनीवरून सदर तार टाकून पुलाच्या खालून तार काढण्यात आल्या होत्या. या तारांना स्पर्श होऊन दोन हरीण मरण पावले. मात्र सोबतच शिकारीही स्वत:च लावलेल्या वीज प्रवाहाच्या झटक्याने मरण पावला.
सदर घटना वन विकास महामंडळाच्या जंगलातील कंपार्टमेंट नं. २४ (चंद्रा फेलिंग सिरीज), मोसम बिट, राऊंड २ मध्ये घडली. या शिकारीत मृतकासह आणखी किमान तीन व्यक्तींचा समावेश असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. अन्य आरोपींचाही लवकरात लवकर शोध घेतला जाईल, अशी माहिती एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक सुनील पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.
मृतक विलास सडमेक हा १० वर्षांपासून सासुरवाडीला राहून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. विभागीय व्यवस्थापक पाटील यांच्या मार्गदर्शनात घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. याप्रसंगी सहायक व्यवस्थापक एस.एल. रामटेके, एस.एस. कोंडागुर्ले, एस. यू. उईके, यू. बी. बिसेन, एम. बी. मेनेवार, गजभिये आदी उपस्थित होते. याशिवाय वन्यजीवप्रेमी रामू मादेशी, सुरेश आलाम, राजू वैद्य, गणेश सडमेक, किशोर सडमेक उपस्थित होते.
या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अभियंता तसेच अहेरीचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर आपल्या कर्मचाºयांसह घटनास्थळी पोहोचले. याप्रसंगी अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज चव्हाण, चंद्रकांत सडमेक आदी उपस्थित होते