‘शेतकरी सन्मान निधी’साठी अडथळ्यांची शर्यत सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:35 PM2019-05-27T22:35:33+5:302019-05-27T22:36:53+5:30
केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्या घाईघाईने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी कुटुंबांना पात्र ठरविण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्या घाईघाईने सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये आर्थिक लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ४२ शेतकरी कुटुंबांना पात्र ठरविण्यात आले होते. परंतू निवडणूक आचारसंहितेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्याचे काम ठप्प पडले आहे. त्यातही ५८३३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे बँक अकाऊंट आणि आधार क्रमांक जुळत नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.
या योजनेचा लाभ वर्षातून चार टप्प्यात दिला जाणार आहे. त्यात फेब्रुवारी ते मे या पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत ६६ हजार ८६ शेतकरी कुटुंबियांचीच नावे एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड होऊ शकली. त्यांच्या बँक खात्यात शासन स्तरावरून २ हजार रुपयांची रक्कम जमा केली जात असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पात्र असतानाही माहिती अपलोड होऊ न शकलेले ५२ हजार शेतकरी अजूनही या योजनेच्या लाभापासून दूर आहे.
विशेष म्हणजे बँंक अकाऊंट नंबर किंवा आधार क्रमांक नसणाऱ्या ५८३३ शेतकरी कुटुंबियांपैकी ७७३ कुटुंबियांची माहिती दुरूस्त करून ती पोर्टलवर टाकण्यात आली आहे. परंतू माहिती अपलोड झालेल्या किती शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला याची माहिती शासनाकडेच असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. या योजनेसाठी संपूर्ण जिल्हाभरात सर्वाधिक पात्र शेतकरी चामोर्शी तालुक्यात आढळले आहेत. या तालुक्यातील २६ हजार २८७ शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली तालुक्यातील १९ हजार ८५४ शेतकरी, आरमोरी तालुक्यातील १५ हजार २५८ शेतकरी, कुरखेडा तालुक्यातील १० हजार ५५२ आणि देसाईगंज तालुक्यातील ९ हजार ३४६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
जूनपासून दुसरा टप्पा
पहिल्या टप्प्यात २ हजार रुपये बँक खात्यात जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता जूनपासून पुढील चार महिन्यांचे २ हजार रुपये आणखी जमा होणार आहेत. मात्र ज्या पात्र शेतकरी कुटुंबियांची माहिती अद्यापही पोर्टलवर पोहोचू शकली नाही त्यांना त्यापासून वंचित राहावे लागणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालयातून हे अपलोडींगचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
आचारसंहितेमुळे रखडले काम
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ लोकसभा निवडणुकीच्या आधीच शेतकऱ्यांच्या मिळावा यासाठी सरकारी यंत्रणेला युद्धस्तरावर काम करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांनी दिवस-रात्र एक करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली. परंतू सरकारी यंत्रणेकडून पहिल्या टप्प्याची रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याआधीच आचारसंहिता लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. परंतू आता आचारसंहिता संपुष्टात आल्याने हे काम मार्गी लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.