‘जो पाजेल नवऱ्याला दारू, त्याला नक्कीच पाडू!’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:12 AM2019-04-05T06:12:54+5:302019-04-05T06:13:17+5:30
गडचिरोली चिमूर मतदारसंघ : दारुमुक्त निवडणुकीचा संकल्प
गडचिरोली : लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ‘मुक्तिपथ’ अभियानाच्या माध्यमातून दारूमुक्त निवडणुकीचा संकल्प केला असून मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचा वापर न करण्याचा निर्धार जाहीर केला आहे.
या मतदारसंघात एकूण ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुक्तिपथच्या आवाहनातून अनेक ठिकाणच्या महिलांनी दारूमुक्त निवडणुकीला प्रतिसाद देत ‘जो पाजेल नवऱ्याला दारू, त्याला नक्कीच पाडू’ असे फलक झळकविले आहेत. त्यामुळे अनेक उमेदवारांनीही याचा धसका घेत मी व माझा पक्ष निवडणुकीत दारूचा वापर करणार नाही, असे लिहून दिले.
सर्चचे संचालक व मुक्तिपथचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी सर्व उमेदवारांचे त्यांच्या संकल्पाबद्दल आभार व्यक्त केले. ‘दारूमुक्त निवडणूक’ या अभियानामुळे निवडणुकीत बेकायदा दारूचा वापर व उमेदवाराचा खर्च कमी होईलच, सोबत मतदार पूर्ण शुद्धीत आपल्या विवेकाने मतदान करतील. हा खºया अर्थाने लोकशाहीचा विजय असेल, असे ते म्हणाले. या निवडणुकीसाठी गडचिरोली-चिमूर मतदार संघातील प्रमुख उमेदवार अशोक नेते, डॉ.नामदेव उसेंडी, डॉ.रमेशकुमार गजबे, देवराव नन्नावरे, हरिश्चंद्र मंगाम या सर्वांनी लिखित रुपात आपला हा संकल्प मुक्तिपथच्या स्वाधीन केला आहे.
जनतेचा जाहीरनामाच बनावा
दरम्यान प्रशासकीय यंत्रणेने निवडणुकीत दारूचा गैरवापर थांबविण्यासाठी कारवाई सुरू केली असून जागोजागी वाहनांची तपासणी, दारूची जप्ती व वारंवार दारूचा गुन्हा करणाऱ्यांना तडीपार केले जात आहे. जनतेने, स्वयंसेवी संस्था, सामाजिक चळवळी आणि जागरूक नागरिकांनी पुढाकार घेऊन जो उमेदवार मतदारांना दारू पाजेल त्यावर बहिष्कार टाकावा. हा एक प्रकारे जनतेचा जाहीरनामा बनावा, असे आवाहन डॉ. अभय बंग यांनी केले आहे.