आदिवासींच्या गाय वाटपात गैरव्यवहार, आयएएस शुभम गुप्ता यांच्यावर ठपका

By संजय तिपाले | Published: August 17, 2024 02:08 PM2024-08-17T14:08:59+5:302024-08-17T14:25:17+5:30

प्रशिक्षणार्थी कालावधीतील कारनामा : अपर आयुक्तांचा अहवाल, कारवाईची शिफारस

IAS Shubham Gupta accused of malpractice in distribution of cows to tribals | आदिवासींच्या गाय वाटपात गैरव्यवहार, आयएएस शुभम गुप्ता यांच्यावर ठपका

IAS Shubham Gupta accused of malpractice in distribution of cows to tribals

गडचिरोली : प्रशिक्षण कालावधीत पूजा खेडकरने केलेले कारनामे चर्चेत असताना आता शेवटच्या टोकावरील गडचिरोलीतील एका आयएएस अधिकाऱ्याचा प्रशिक्षणार्थी कालावधीतील 'पराक्रम' उजेडात आला आहे. आदिवासींच्या गायवाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर ठपका  आहे. आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील अप्पर आयुक्तांनी याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला अहवाल दिला असून त्यात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस केली आहे.

सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना गडचिरोलीतील अतिदुर्गम व नक्षलप्रभावित भामरागडच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कार्यरत होते.  वर्षभरापूर्वी भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासी लाभार्थ्यांना   दुधाळ गायी वाटपाची योजनेंतर्गत लाभ दिला होता. मात्र,  गाय घेण्यासाठी मंजूर निधी लाभार्थ्यांच्या खात्यातून इतरत्र वळविण्यात आल्याचे समोर आले होते. याबाबत तक्रारी झाल्या व माध्यमांतूनही हा विषय समोर आला. यानंतर आदिवासी विभागाने चौकशी समिती नेमली होती.  समितीने लाभार्थी, कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत अहवाल शासनाकडे सादर केला. या अहवालात तपशीलवार माहिती नमूद असून कथित गाय वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा आरोप शुभम गुप्ता यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बोगस पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सह्या जोडल्याचाही ठपका त्यांच्यावर आहे.

इतकेच नव्हे तर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील गुप्ता यांनी धमकावून आमच्याकडून नियमबाह्यपणे काम करून घेतले, असाही धक्कादायक दावा केला आहे. तब्बल वर्षभरानंतर हा चौकशी अहवाल राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे सोपविण्यात आला आहे.  याबाबत शासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.  दरम्यान, शुभम  गुप्ता यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.   कोणतेही पुरावे नसताना या अहवालात चुकीच्या पद्धतीने माझ्यावर दोषारोप करण्यात आलेले आहे. त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असे त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रेयेत स्पष्ट केले आहे.

शुभम गुप्ता सतत वादाच्या भोवऱ्यात
एटापल्ली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना शुभम गुप्ता यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. आमदार डॉ. देवराव होळी यांनी गुप्ता हे कंत्राटदारांना धमकावून लाच मागत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दोन वर्षानंतर याही प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य आणि परिवहन विभागाचा नकारात्मक अभिप्राय असताना देखील गुप्ता यांनी लाखो रुपये खर्च करून तांत्रिक दृष्ट्या अयोग्य अशा दुचाकी रुग्णवाहिका खरेदी केल्या होत्या. सध्या त्या धूळखात पडून आहेत. त्यानंतर ते धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी म्हणून रुजू झाले. त्याहीठिकाणी त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर आक्षेत घेत अविश्वास आणला होता.
 

Web Title: IAS Shubham Gupta accused of malpractice in distribution of cows to tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.