कोंदावाही गावाची आदर्श बांबू ग्रामकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 10:31 PM2019-08-06T22:31:27+5:302019-08-06T22:31:47+5:30
विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एसटीआरसी), गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत बांबू हस्तकला व उपजीविका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून धानोरा तालुक्यातील कोंदावाही या गावाची ‘आदर्श बांबू ग्राम’कडे वाटचाल सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एसटीआरसी), गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत बांबू हस्तकला व उपजीविका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून धानोरा तालुक्यातील कोंदावाही या गावाची ‘आदर्श बांबू ग्राम’कडे वाटचाल सुरू झाली आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ५ आॅगस्ट रोजी सोमवारला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, उमेदच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन प्रमुख चेतना लाटकर, एसटीआरसीचे आशिष घराई आदी मान्यवर उपस्थित होते.
बांबूला गरीबाचे सोने म्हटले जाते. हे सोने गडचिरोली जिल्ह्यात विपूल प्रमाणात उपलब्ध आहे. कोंदावाही हे गाव गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर दुर्गम व विकसनशील असे गाव आहे. या गावामध्ये एसटीआरसी बांबूपासून आदर्श बांबू ग्राम निर्माण करीत आहे. बांबूच्या बल्कोवा, तुरडा, मानवले, कटांगा अशा संकरित रोपांची २०० हेक्टर जागेत लागवड करण्यात येत आहे. यासाठी गडचिरोली वनविभागाची विशेष मदत मिळत आहे. सुमारे एक लक्ष रोपांचे उद्दिष्ट असून चांगल्या प्रजातीचे रोप अडीच ते तीन वर्षांत विक्रीसाठी व हस्तकलेसाठी कोंदावाही गावातून उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे या गावाला बांबू विक्रीतून वाढीव दर मिळून गावाचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या ठिकाणी स्टिकटस या प्रजातीचे रोप लावून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनीही वृक्षारोपण केले.
बांबू हस्तकलेतून रोजगार निर्मिती करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रातर्फे कोंदावाही गावातील सात युवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. हे युवक आता गावातील महिला व इतर युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. या गावामध्ये विशेष उपकरणे असलेले कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरचे सुद्धा उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बांबू कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन येथे लावण्यात आले होते. या वस्तूंचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. सदर गावाला बांबू टूरिझमच्या दिशेने नेण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यापासून गावाला अधिक सक्षम रोजगाराची साधने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाला नागपूरचे प्रा.कमलेश माडुरवार उपस्थित होते. त्यांनी बांबू संशोधनाबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एसटीआरसीचे मुख्य कार्यक्रम अधिकारी अशिष भराई यांनी केले. त्यांनी बांबू उपजीविका कार्यक्रमाची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे संचालन व नियोजन एसटीआरसीचे वैज्ञानिक अधिकारी रंजन पांढरे यांनी केले. आभार ग्रामसभा अध्यक्ष देवाजी पदा यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाला गाव व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गावाची-जिल्हाधिकारी
शासन व प्रशासन नागरिकांच्या व गावाच्या विकासासाठी विविध योजना अंमलात आणते. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी गावाचे योगदान महत्त्वाचे आहे. सोबत ग्रामस्थांमध्ये आवडही निर्माण झाली पाहिजे. शासन व प्रशासनाने आणलेल्या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील गावाची तितकीच आहे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी बांबू हस्तकला व बांबू उपजीविकेबाबत माहिती जाणून घेतली. बांबू वस्तूंचे प्रकार, त्याची विक्री, उपाययोजना व किंमत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. वस्तूंचे डिझाईन व त्यावरील संशोधनावर सुद्धा त्यांनी भाष्य केले. मागील काही भेटीमध्ये एसटीआरसीच्या मुख्य कार्यक्रम अधिकाºयासोबत झालेल्या चर्चेमधून सदर केंद्राच्या वतीने गडचिरोलीतील लोकांसाठी चांगला उपक्रम सुरू असल्याचे दिसून आले. एसटीआरसी लोकांसाठी वेगवेगळ्या उपजीविका कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगळा पायंडा पुढे आणत आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र व कोंदावाहीवासीयांचे कौतुक केले.