"गावाजवळ जंगली हत्तींचा कळप आल्यास मिरचीचा धूर करा!"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 05:00 AM2021-10-25T05:00:00+5:302021-10-25T18:21:54+5:30
छत्तीसगड राज्याला सीमेला लागून असलेल्या कन्हारटाेला, मुंजालगाेंदी जंगल परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने २० ऑक्टाेबरपासून मुक्काम ठाेकला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : हत्तीपासून बचाव करण्यासाठी काय करावे, याबाबत वन विभागामार्फत धानाेरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. गावाजवळ हत्ती आल्यास व त्याच बाजूने हवा असल्यास आगीत मिरची टाकून धूर करावा, असा सल्ला वन विभागामार्फत दिला जात आहे. याशिवाय गावागावात बॅनर लावून नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे.
छत्तीसगड राज्याला सीमेला लागून असलेल्या कन्हारटाेला, मुंजालगाेंदी जंगल परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने २० ऑक्टाेबरपासून मुक्काम ठाेकला आहे. हत्तींच्या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला, तसेच हत्तींनी काही घरांची ताेडफाेडसुद्धा केली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गडचिराेली जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या माेठ्या प्रमाणात हत्ती आले आहेत. त्यामुळे हत्तींपासून स्वत:चे संरक्षण कसे करावे, याची माहिती स्थानिक नागरिकांना नाही. त्यामुळे नागरिक गाेंधळलेल्या स्थितीत आहेत. रात्रीच्या सुमारास गावावर हत्तींचा हल्ला झाल्यास अनेकांचे जीव जातील, या भीतीने गावातील नागरिक रात्रीच्या सुमारास पहारा ठेवत आहेत. शेकाेट्या पेटविल्या जात आहेत. मात्र किती दिवस असेच राहणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने स्वतंत्र पथक नेमले आहे. गडचिराेलीचे वन संरक्षक डाॅ. किशाेर मानकर, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहायक वन संरक्षक साेनल भडके यांनी या परिसरात जाऊन नागरिकांसाेबत चर्चा केली. तसेच वन कर्मचाऱ्यांना याेग्य ते निर्देश दिले आहेत. गावात माहितीपत्रके चिकटविण्यात आली आहेत. गावातील लाेकांची सभा घेऊन मार्गदर्शन केले जात आहे.
हत्तींपासून संरक्षणासाठी हे करा...
>> जंगली हत्ती गावाच्या दिशेने आल्यास वन विभागाला तत्काळ सूचना द्या.
>> हत्तींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.
>> गावाच्या सभाेवताली आग पेटवून ठेवा.
>> ज्या दिशेने हत्तींचा कळप आहे, त्याच दिशेने हवा असेल, तर आगीमध्ये मिरची टाकून धूर करा.
>> कुत्र्यांना भुंकू देऊ नका.
>> अन्नधान्य लाेखंडी ड्रममध्ये ठेवा.
>> हत्तींचा कळप गावाच्या दिशेने येण्याची चाहूल लागताच लहान मुले, वयस्क नागरिक व महिलांना सुरक्षितस्थळी पाेहाेचवा.
>> दिवसा हत्ती आराम करतात. त्यामुळे या कालावधीत त्यांना त्रास देऊ नका.
>> गाव, घराच्या बाजूला लख्ख प्रकाश असलेले बल्ब लावा.
>> गावात हत्ती आल्यास पक्क्या इमारतींचा आसरा घ्या.
>> हत्ती जर अचानक अंगावर धावून आला, तर त्यापासून संरक्षणासाठी कापड, शाल, लुंगी, धाेती यासारख्या वस्तू त्याच्या दिशेने फेका.
>> रात्री घराच्या बाहेर निघू नका. फटाके फाेडून त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करू नये, अशा सूचना वन विभागाने केल्या आहेत.