खरीपातील धानाची उचल न झाल्यास रब्बी हंगामात खरेदी हाेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:28 AM2021-04-29T04:28:37+5:302021-04-29T04:28:37+5:30
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी संस्थेच्या कार्यक्षेत्रात १३ गावांचा समावेश असून या भागात रब्बी धान उत्पादकांची संख्या मोठी असून सन २०१९_ ...
आरमोरी तालुक्यातील देलनवाडी संस्थेच्या कार्यक्षेत्रात १३ गावांचा समावेश असून या भागात रब्बी धान उत्पादकांची संख्या मोठी असून सन २०१९_ २० मध्ये खरीप हंगामातील ११ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली होती. त्यानुसार सन २०२० -२०२१ या खरीप हंगामात १५ हजार क्विंटल धानाची देलनवाडी खरेदी केंद्रावर खरेदी होण्याची शक्यता आहे. कारण या केंद्रावर वडेगाव, विहीरगाव, मौशीखांब या केंद्राला संलग्न गाव सुद्धा रब्बी हंगामात जोडले आहेत. चालू खरीप हंगामात ३०,००० क्विंटल पेक्षा अधिक धानाची खरेदी देलनवाडी केंद्रावर झाली त्यापैकी आतापर्यंत अत्यल्प २ हजार ५०० क्विंटल धानाची उचल झालेली आहे. त्यामुळे संस्थेच्या धान साठवणूकीसाठी गोदाम तसेच खुली जागा उपलब्ध नाही.
रब्बी धान खरेदी साठी शेतकऱ्यांचे सातबारा (शेतीचे प्रमाणपत्र)आधार कार्ड, बँक पासबुक संस्थेने स्वीकारले आहे. मे महिन्याच्या प्रारंभापासून धान शेतकऱ्यांच्या हाती येण्यास सुरुवात होते. तेव्हा रब्बीतील धान खरेदीसाठी जागा मोकळी करून द्यावी, यासाठी खरिपातील धानाची उचल करावी, अशी मागणी आदिवासी विविध कार्यकारी संस्था देलनवाडी यांच्या संचालक मंडळाने केली आहे.
कोट
जून महिन्यापासून सुरु होणारे मान्सून यामुळे खरिपाची धान खरेदी खुल्या जागेवर करता येणे शक्य नाही. म्हणून किमान संस्थेच्या गोदामात असलेल्या धानाची उचल आदिवासी विकास महामंडळाने केल्यास रब्बीची धान खरेदी करणे शक्य होणार आहे.
दिलीप कुमरे
व्यवस्थापक ,आदिवासी विविध कार्यकारी संस्था, देलनवाडी