मोहफुलाला चांगला भाव मिळत असेल तर मद्यनिर्मितीला विरोध का?, विजय वडेट्टीवारांचा सवाल
By संजय तिपाले | Published: January 14, 2024 05:18 PM2024-01-14T17:18:58+5:302024-01-14T17:20:58+5:30
दारुबंदीवरुन सुरु असलेल्या समर्थन व विरोधाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडताना मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, असा इशाराही दिला.
गडचिरोली : जिल्ह्यात मोहफुलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. वन्यप्राण्यांचा धोका पत्करुन आदिवासी भल्या पहाटे मोहफुले गोळा करण्यासाठी जंगलात जातात. या मोहफुलांपासून मद्यनिर्मिती कारखाना होत असेल, आदिवासींना मोहफुलातून चांगले पैसे मिळत असतील तर या कारखान्याला विरोध कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. समाजसेवेचा बुरखा पांघरुन आदिवासींच्या हिताच्या गोष्टीला विरोध केला जात असेल तर हे शोषण आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसच्या आढावा बैठकीसाठी विजय वडेट्टीवार हे १४ जानेवारीला गडचिरोलीत आले होते. पोटेगाव रोडवरील रानफुल निवासस्थानी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर, डॉ. चंदा कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ॲड.विश्वजित कोवासे, युवक काँग्रेस प्रदेश सहसचिव कुणाल पेंदोरकर उपस्थित होते.
दारुबंदीवरुन सुरु असलेल्या समर्थन व विरोधाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका मांडताना मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, असा इशाराही दिला. ते म्हणाले, मद्यनिर्मिती कारखान्याला विरोध करण्यापूर्वी जिल्ह्यात दारुबंदी आहे कोठे, इथून विचार केला पाहिजे. परजिल्ह्यातून दारु मोठ्या प्रमाणात येते, मोहफुलाची दारुही तितक्याच प्रमाणात विकली जाते. दरवर्षी मोहफुलाचे होणारे संकलन बघता जिल्ह्यात मद्यनिर्मिती कारखाना उभा राहिल्यास या मोहफुलाला चांगला भाव येईल. आदिवासींची लूट थांबेल. दारूची विक्री जिल्ह्यात करू नका, ही मागणी एकवेळ ठीक पण कारखानाच नको म्हणणे म्हणजे आदिवासींचे शोषण करण्याजोगे आहे. अतिशय परिश्रमाने आदिवासी मोहफुल गोळा करतात, ते डॉ. अभय बंग यांचा मुलगा विकत घेतो काय, असा प्रश्नही त्यांनी केला. यासंदर्भात डॉ. अभय बंग यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कॉल घेतला नाही, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
दारुबंदी पुन्हा चर्चेत
हिवाळी अधिवेशादरम्यान गडचिरोली ‘एमआयडीसी’ येथे मोहफुलापासून मद्यनिर्मिती कारखान्याचे भूमिपूजन झाले होते, पण दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात दारू निर्मिती नको, म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग, देवाजी तोफा व दारूबंदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विरोध दर्शवला होता. त्यानंतर फडणवीस यांनी कारखाना होणार नाही, असे स्पष्ट केले होते. यावर वडेट्टीवार यांनी मद्यनिर्मितीला समर्थन देत डॉ. अभय बंग यांच्यावर टीका केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.