‘नक्षलींशी लढताना वीरमरण आले असते तर एवढे दु:ख झाले नसते’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:59 AM2019-05-17T05:59:14+5:302019-05-17T05:59:32+5:30
'... पण एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे नक्षलवाद्यांच्या स्फोटात त्यांना मरण आले ते अतिशय क्लेशदायक आहे.'
गडचिरोली : नक्षलवाद्यांशी लढताना बंदुकीची गोळी लागून त्यांना वीरमरण आले असते तर एवढे दु:ख झाले नसते. पण एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे नक्षलवाद्यांच्या स्फोटात त्यांना मरण आले ते अतिशय क्लेशदायक आहे. आमचे संसार उद्ध्वस्त करणाºया त्या अधिका-याला निलंबित करा. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आर्त मागणी शहीद पोलीस जवानांच्या वीरपत्नींनी केली आहे.
१ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरूंग स्फोटात कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) शैलेश काळे यांच्या नेतृत्वाखालील क्युआरटी पथकातील १५ जवान आणि त्यांना घेऊन जाणा-या खासगी मालवाहू वाहनाच्या चालकाला वीरमरण आले. त्यातून सावरत आठ शहीद जवानांच्या वीरपत्नी व एका जवानाच्या बहिणीसह इतर कुटुंबियांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले.
काळे यांची नंदुरबार येथे बदली करण्यात आली. पण त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. याचा अर्थ पोलीस विभाग त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते, असे वीरपत्नी म्हणाल्या. वास्तविक शहीद झालेल्या जवानांच्या क्युआरटी पथकाला कमांडरच नव्हता. तो का नव्हता याचीही चौकशी झाली पाहिजे. रस्ता मोकळा न करताच क्यूआरटी पथकाला तातडीने बोलविण्याचे कारण काय, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.