समाजात विचार पेराल तर ५०० वर्षे टिकतील
By admin | Published: January 13, 2017 12:44 AM2017-01-13T00:44:19+5:302017-01-13T00:44:19+5:30
वैचारिकतेच्या आधारावर समाज प्रगती साधू शकतो. ज्याप्रमाणे शेतकरी धान्य पेरतो तर ते त्याला वर्षभर पुरतात.
ज्ञानेश महाराव यांचे प्रतिपादन : कमल-गोविंद प्रतिष्ठानतर्फे विद्याभारती कन्या विद्यालयात व्याख्यान
गडचिरोली : वैचारिकतेच्या आधारावर समाज प्रगती साधू शकतो. ज्याप्रमाणे शेतकरी धान्य पेरतो तर ते त्याला वर्षभर पुरतात. समाजात नीतीयुक्त माणसे निर्माण केल्यास ते ५० वर्ष पुरतील. त्याचप्रमाणे समाजात सामाजिकतेचे विचार पेरल्यास ते ५०० वर्षे टिकतील, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी गुरूवारी केले.
कमल-गोविंद स्मृतीप्रतिष्ठानच्या वतीने गो. ना. मुनघाटे यांच्या जयंती निमित्ताने स्थानिक विद्याभारती कन्या विद्यालयात आयोजित ‘उठावा महाराष्ट्र देश’ व्याख्यानात महाराव बोलत होते. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार होते. यावेळी दंडकारण्य शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष तथा कमल-गोविंद प्रतिष्ठानचे आमंत्रक प्राचार्य भैय्यासाहेब ठाकरे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, कमल-गोविंद प्रतिष्ठानचे संचालक अनिल मुनघाटे, लोकविज्ञान प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष डॉ. कल्पना मुनघाटे उपस्थित होत्या. याप्रसंगी पुढे बोलताना ज्ञानेश महाराव म्हणाले, समाज अद्यापही विचारांनी जागरूक झालेला नाही. डोक्यावरती काय घ्यायचे व डोक्यातून काय फेकायचे ते अद्यापही समाजाला कळलेले नाही. देशात माणसापेक्षा दगड मोठे होत आहेत, ही बाब देशासाठी धोकादायक असून असा देश कधीही मोठा होऊ शकत नाही. गेल्या ३० वर्षांपासून राज्यात लोकांमध्ये भ्रम पसरवून भ्रामक कल्पना व धार्मिक अवडंबर माजविला जात आहे. त्यामुळे माणसाला भावनेपेक्षा बुध्दीने अधिक विचार करणे गरजेचे आहे. मेंदूला केवळ दगड बनवून ठेवलेले चालणार नाही. दिशा शोधायला लागल्यास आयुष्याची दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादनही ज्ञानेश महाराव यांनी केले. व्याख्यानाला कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे व अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान छायाचित्र प्रदर्शनीतील विजेत्यांसह प्रोत्साहन बक्षीस मिळविणाऱ्या स्पर्धकांचा रोख पारितोषिक व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रास्ताविक अनिल मुनघाटे तर आभार स्मिता लडके यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)