काय सांगता...? दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्यास ठाेठावणार १० हजारांचा दंड!
By गेापाल लाजुरकर | Published: May 6, 2023 03:49 PM2023-05-06T15:49:45+5:302023-05-06T15:50:02+5:30
पकानभट्टी येथे गावसंघटनेचा निर्णय, ठाणेदारांच्या उपस्थितीत ठराव पारित
गडचिराेली : काेरची शहरातील वाॅर्ड नं. १ पकानभट्टी येथे मुक्तिपथ, पोलिस विभाग आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक पोलिस निरीक्षक अमोल फरतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी अवैध दारूविक्री बंदीचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. विशेष म्हणजे, दारू पिऊन भांडण करून पत्नीला मारहाण करणाऱ्यांकडूनही १० हजारांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यात दारू गाळून विक्री करणाऱ्यांवर गाव संघटनेच्या माध्यमातून १० हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे, तसेच ठरावाचे उल्लंघन करीत मुजोरीने दारू विक्री करणाऱ्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर बैठकीत पारित झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके, रामनाथ कोरचा, ग्रामसभा अध्यक्ष सुरेश काटेंगे, पोलिस पाटील लालाजी तोफा यांच्यासह गावकरी उपस्थित हाेते.
बैठकीत आणखी काय सांगितले?
नागरिकांनी शासकीय याेजनांचा लाभ घेतल्यास कुटुंबाचा गाडा सुरळीत चालवता येतो. शिक्षण, संस्कार जपावेत, असे आवाहन करीत आधुनिक शेती, मोहफुलापासून इतर खाण्याचे पदार्थ बनवता येतात. या माध्यमातून पैसे कमावता येतात, माेहफुलाची दारू ही अस्सल नसून काेणत्याही झाडांची फुले, तसेच पाणे सडवून दारू गाळली जाते, तसेच त्यात युरिया मिसळला जाताे. परिणामी आराेग्यावर दुष्परिणाम हाेतात, असे सांगितले.