काम करता येत नसेल तर घरी बसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:31 PM2017-10-23T23:31:56+5:302017-10-23T23:32:13+5:30
प्रत्येक घर संपन्न करण्यासाठी, घराघरात रोजगार-स्वयंरोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी चांगल्या योजना आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रत्येक घर संपन्न करण्यासाठी, घराघरात रोजगार-स्वयंरोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी चांगल्या योजना आहेत. प्रत्येक अधिकाºयाने यात सहभागी होऊन नागरिकांना त्या योजनांचा लाभ द्यावा. अधिकारी केवळ पगार घेण्यासाठी नाहीत. त्यामुळे काम करता येत नसेल तर त्यांनी नोकरी सोडून घरी बसावे, अशा शब्दात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अधिकाºयांना फटकारले.
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) नागरी कृती कार्यक्रमाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. येथील १९२ बटालियनच्या मुख्यालयात सोमवारी दुपारी झालेल्या या कार्यक्रमाला खा.अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, सीआरपीएफचे महानिरीक्षक राजकुमार, उपमहानिरीक्षक टी.शेखर, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बटालियन १९१ चे कमांडिंग आॅफिसर प्रभाकर त्रिपाठी, बटालियन ३७ चे कमांडिंग आॅफिसर श्रीराम मिना, भाजपचे पदाधिकारी रवी भुसारी, डॉ.वसंत कुंभारे, अति.जिल्हाधिकारी सुरेश चौधरी यांच्यासह सीआरपीएफचे अनेक अधिकारीगण उपस्थित होते.
यावेळी अहीर पुढे म्हणाले, लोकशाहीत सर्वांना समान अधिकार आहे. पण नक्षलग्रस्त नागरिकांना तो मिळत नाही. अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तरीही ग्रामपंचायतींमध्ये मतदान करण्यासाठी नक्षलवाद्यांचा विरोध झुगारून ते पुढे येतात. याचा अर्थ त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळेच आता पोलीस कॅम्पच्या माध्यमातून नक्षलग्रस्त नागरिकांसाठी योजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी आता मर्यादित निधी असला तरी भविष्यात मोठा निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नक्षलग्रस्त भागात आज अनेक समस्या आहेत. तरीही रस्ते, नाल्या, पूल या सुविधांसोबतच आर्थिक संपन्नता आणणे जास्त गरजेचे असल्याचे यावेळी अहीर म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस चांगले काम करीत असल्याची पावतीही अहीर यांनी आपल्या भाषणात दिली. नक्षलविरोधी अभियान राबविणारे माहेश्वर रेड्डी यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. पोलीस दलात विविध उपकरणांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने २५ हजार ६० कोटी रुपये दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दीप प्रज्ज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात सीआरपीएफचे महानिरीक्षक राजकुमार म्हणाले, नागरी कृती कार्यक्रमांतर्गत यावर्षाकरिता शासनाकडून १ कोटी ३० लाख रुपये मिळाले आहेत. त्याअंतर्गत मार्च २०१८ पर्यंत ४३ गावांमधील १७५ कुटुंबिय, ८१० युवक आणि २५० महिलांसह एकूण १२३५ लोकांना लोकांना स्वयंरोजगार उभारण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, बकरीपालन, शिवणकाम आदींसाठी मदत केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी ना.अहीर यांच्या हस्ते १२५ बकºया, १३० कोंबड्या आणि १५ शिलाई मशिन वाटण्यात आल्या.
सबका साथ, सबका विकास
नागरी कृती कार्यक्रमासाठी संगणक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या ग्रामीण भागातील १० युवकांना प्रतिनिधीक स्वरूपात गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरणासाठी बोलविण्यात आले होते. त्या युवकांना सीआरपीएफच्या १९१ बटालियनकडून टी-शर्टही दिले होते. त्यावर मागील बाजुने ‘सबका साथ, सबका विकास’ हा भाजपने निवडणूक प्रचारादरम्यान लावलेला नाराही नोंदविला होता. सरकारकडून योजनांची प्रचार-प्रसिद्धी करताना अधिकृतपणे वापरला जाणारा हा नारा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
गृहराज्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत कार्यक्रमाला तीन तास विलंब
नियोजित कार्यक्रमानुसार गृहराज्यमंत्री हंसराज अहीर सकाळी ११ वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचणार होते. त्यासाठी जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातून आणण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सकाळी १० वाजताच कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांमध्ये बसविले होते.
पण यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमात वेळ लागल्यामुळे ना.अहीर तब्बल दुपारी २ वाजता कार्यक्रमाला पोहोचले. त्यामुळे तीन तास सर्वांना ताटकळत राहावे लागले.