गोडाऊन नसेल तरी धान खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:15 AM2019-05-17T00:15:04+5:302019-05-17T00:16:08+5:30
आदिवासी उपयोजना क्षेत्रात शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला आधारभूत किमतीत खरेदी करणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. त्यामुळे खरेदी संस्थांकडे धान साठवणुकीसाठी गोडाऊनची उपलब्धता असेल किंवा नसेल तरी खरेदी प्रक्रिया निर्विघ्नपणे राबविण्यात येईल. याकरिता नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : आदिवासी उपयोजना क्षेत्रात शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला आधारभूत किमतीत खरेदी करणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. त्यामुळे खरेदी संस्थांकडे धान साठवणुकीसाठी गोडाऊनची उपलब्धता असेल किंवा नसेल तरी खरेदी प्रक्रिया निर्विघ्नपणे राबविण्यात येईल. याकरिता नियोजन करावे, असे निर्देश आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी केले.
जिल्ह्याच्या तीन दिवशीय दौºयावर नितीन पाटील आले असता त्यांनी गुरूवारी आविमच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाला भेट देऊन धान खरेदी व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आ.कृष्णा गजबे, प्रादेशिक व्यवस्थापक जे.पी. राजुरकर, अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुळेवार, कुरखेडाचे नीलेश सोरपडे उपस्थित होते. रबी धान प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेल्या शंका संदर्भात जाब विचारण्याकरिता परिवर्तन संघटनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपप्रादेशिक कार्यालयावर धडक देऊन नितीन पाटील यांच्याशी चर्चा केली.
कुरखेडा तालुक्यात रबी हंगामात १० पैकी केवळ एकच खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. माल साठवणुकीकरिता पुरेशा प्रमाणात संस्थांकडे गोडाऊनची व्यवस्था नसल्याची सबब सांगितली. त्यामुळे उर्वरित नऊ खरेदी केंद्रांबाबत शंका निर्माण झाली. खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या हजारो क्विंटल धानाची उचल न झाल्याने संस्थांच्या पटांगणात ते उघड्यावर पडून आहेत. खराब हवामानाचा फटका धानाला बसत आहे. तरी सुद्धा तूट निर्माण झाल्यास संस्थांना जबाबदार धरून वसुली करण्यात येते. वास्तविक विहीत मुदतीत मालाची उचल होणे गरजेचे आहे. परंतु महामंडळाकडून होणाºया दिरंगाईचा फटका संस्थांना सोसावा लागतो. खरेदी संस्थांना मालाच्या सुरक्षिततेकरिता पुरेशा प्रमाणात ताडपत्र्यांचा पुरवठा करण्यात आलेला नाही, आदी समस्या शिष्टमंडळाने व्यवस्थापकीय संचालकांसमोर मांडल्या. यावर नितीन पाटील यांनी खरेदी संस्थांकडे गोडाऊन असेल किंवा नसेल तरी खरेदी प्रक्रिया बंद करण्यात येणार नाही, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, विलास गावंडे, खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागिलवार, आविका पदाधिकारी संघटनेचे अध्यक्ष चांगदेव फाये, आशिष काळे, नगरसेवक पुंडलिक देशमुख, विनोद खुणे, मधुकर शेंडे, तेजराम बुद्धे, दशरथ लाडे, माधव तलमले, हेमंत शेंद्रे, सुधाकर वैरागडे, अनिल उईके, गुणाजी कवाडकर व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
ताडपत्र्या उपलब्ध होणार
धानाच्या संरक्षणाकरिता महामंडळाने ६५ लाख रुपयांची ताडपत्री खरेदीची निविदा काढलेली आहे. संबंधित यंत्रणेला ७ लाख ५० हजार बारदाना पुरवठ्याचा आदेश देण्यात आला आहे, असे नितीन पाटील यांनी सांगितले.