...तर वाचले असते काही पोलिसांचे प्राण, अधिकाऱ्यांचा आततायीपणा नडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:02 AM2019-05-08T06:02:18+5:302019-05-08T06:02:32+5:30
कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
गडचिरोली - कुरखेडा तालुक्यात १ मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेसाठी अधिकाऱ्यांचा आततायीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलीस दलाकडे ३४ भूसुरूंग रोधक वाहने असताना ‘क्युआरटी’च्या (शिघ्र प्रतिसाद पथक) १५ जवानांसाठी त्यापैकी एकही वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. हे वाहन असते तर भूसुरूंग स्फोटाची झळ कमी जीवित हानी टाळणे शक्य झाले असते, असा कयास आहे.
जिल्हा पोलीस दलाकडे नक्षलविरोधी अभियानासाठी २००७ मध्ये काही भूसुरूंग रोधक वाहने आली होती. त्यानंतर टप्प्या टप्प्याने
अशी एकूण ३४ वाहने गडचिरोली पोलिसांना मिळाली. जिल्ह्यात १० उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या नियंत्रणाखाली १० क्युआरटी पथक आहेत. नक्षलविरोधी मोहिमेत तातडीने कुठेही जाण्यासाठी या पथकाला नेहमी सज्ज असावे लागते. त्यामुळे या पथकांसाठी १० भूसुरूंग रोधक वाहने असणे आवश्यक असताना त्या दिवशी कुरखेडा येथे हे वाहन नव्हते.
परिणामी अधिकाºयांच्या आदेशानुसार या पथकाला तातडीने खासगी वाहनातून नक्षलवाद्यांनी वाहनांची जाळपोळ केली त्या दादापूरकडे निघावे लागले. पण तिथे पोहोचण्यापूर्वीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी घात केला.
नक्षलींच्या खबरीमुळे त्यांचा डाव यशस्वी
दादापूरमध्ये रस्त्याच्या कामावरील कंत्राटदाराची वाहने जाळल्यानंतर पोलीस तिकडे जातील याचा अंदाज घेऊन जांभुळखेडा ते लेंढारीदरम्यानच्या छोट्या पुलाखाली नक्षलवाद्यांनी आधीच भूसुरूंग पेरून ठेवले होते. पण जानेवारीतच डांबरीकरणाने गुळगुळीत झालेल्या रस्त्यावर भूसुरुंग पेरला असू शकतो याची पुसटशीही कल्पना पोलिसांना आली नाही. त्यामुळे कुरखेडाचे एसडीपीओ शैलेश काळे यांनी क्युआरटी पथकाला तिकडे बोलविताच हे १५ जवान निघाले. पोलीस पथक तिकडे निघाल्याचे कुरखेडा येथूनच खबरीकडून नक्षलवाद्यांना कळल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.