शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यास राकाँचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:28 AM2019-01-06T00:28:27+5:302019-01-06T00:30:35+5:30
राज्याच्या अनेक भागात खरीप पिकांची स्थिती यावर्षी वाईट असताना पीक चांगले आल्याचे दाखवून पैसेवारी वाढविण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याची पैसेवारी मात्र अद्यापही जाहीर करण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या अनेक भागात खरीप पिकांची स्थिती यावर्षी वाईट असताना पीक चांगले आल्याचे दाखवून पैसेवारी वाढविण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याची पैसेवारी मात्र अद्यापही जाहीर करण्यात आली नाही. ही पैसेवारी कमी दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जिल्हा परिषद सभापती भाग्यश्री आत्राम यांनी दिला.
यावर्षी अनियमित पावसामुळे धानाचे उत्पादन घटले. पीक गर्भार असताना योग्य प्रमाणात पाऊस न झाल्याने धान भरला नाही. परिणामी धानाचा अपेक्षित मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. असे असताना उतारा जास्त दाखवून शेतकºयांना भरपाईपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप सभापती आत्राम यांनी केला.
आधीच शेतकऱ्यांच्या धान व ईतर पिकांना योग्य भाव नसल्यामुळे त्यांना उत्पादन खर्च परवडत नाही. त्यात कीड आणि पावसाच्या अनियमितपणाने शेतकरी हवालदिल असताना त्यांना शासन व प्रशासनाने मदतीस पात्र ठरवून दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.