योजनांबद्दल अनभिज्ञता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:55+5:302021-06-25T04:25:55+5:30
भामरागड : कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी ...
भामरागड : कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.
पाेर्लात फवारणी करा
गडचिरोली : नजीकच्या पाेर्ला येथील अनेक वाॅर्डांतील अनेक नाले साचले आहेत. तसेच परिसरात मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाॅर्डातील नागरिकांना डासांचा त्रास होत आहे.
मधसंकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी
धानोरा : जिल्ह्यात मधसंकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मधसंकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मधसंकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे.
बँकांअभावी अडचण
धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील अनेक ग्राहक २० ते २५ किमीची पायपीट करतात.
कव्हरेजचा अभाव
अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावांतील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही. अतिदुर्गम भागात कव्हरेज नाही.
सातबारा मिळेना
वैरागड : वनहक्क कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना अतिक्रमित जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, सदर पट्टे मिळालेले शेकडो शेतकरी सातबारापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास अडचणी आहेत. सातबारा नसल्याने कृषी याेजनांचा लाभ मिळत नाही.
टिल्लू पंपाचा सर्रास वापर
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने दिवसातून दोनदा नळपाणीपुरवठा नियमित केला जातो. मात्र, रामनगर, स्नेहनगर परिसरात काही नागरिक आपल्या घरच्या नळाला टिल्लू पंप लावत असल्याने इतर नागरिकांच्या घरांमधील नळांतील पाणीप्रवाह कमी होतो. अनेकांना पुरेसे पाणीही मिळत नाही.
दुधाळ गायींचे वाटप करा
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याचशा पशुपालकांकडे हडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना दुधाळ गायींचे वाटप करावे, अशी मागणी हाेत आहे.