पशुयोजनेपासून अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:37 AM2021-04-01T04:37:07+5:302021-04-01T04:37:07+5:30

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या ...

Ignorant of animal husbandry | पशुयोजनेपासून अनभिज्ञ

पशुयोजनेपासून अनभिज्ञ

Next

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पशुसंवर्धन विभागाने या योजनांविषयी व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे.

बसफेऱ्या वाढवा

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक नागरिक मूल, चंद्रपूरला ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच प्रवाशांची वर्दळ राहते. त्या तुलनेत बसफेऱ्या कमी आहेत. परिणामी, नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागताे.

बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित

गडचिरोली : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा.पं.च्या जनजागृतीअभावी बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित आहेत.

कुंपणाअभावी शेतीचे जनावरांकडून नुकसान

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेतपिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गांतील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी, अशी मागणी आहे.

उपाहारगृहांमध्ये नियमांचे उल्लंघन

गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयांच्या उपाहारगृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, संबंधित विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येते.

फवारणीची मागणी

गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे फवारणी करावी.

शासकीय योजना राबवा

चामाेर्शी : आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे योजनांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागात योजनाच पोहोचल्या नाहीत. राज्य शासनाने निधीची तरतूद करावी, अशी मागणी आहे.

भ्रमणध्वनीसेवा विस्कळीत

कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात शासनातर्फे भारतीय दूरसंचार निगमची भ्रमणध्वनीसेवा सुरू करण्यात आली. करोडो रुपये खर्च करून रेपनपल्ली येथे बीएसएनएल भ्रमणध्वनीसेवेचा मनोरा उभारण्यात आला. मात्र, या टॉवरला रेंज राहत नसल्याने भ्रमणध्वनीसेवा कुचकामी ठरली आहे.

स्वच्छतागृहे उभारा

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी जागा नाही. काही नागरिक इंदिरा गांधी चौकातील सभागृहात लघुशंका करतात.

सिरोंचात डुकरांचा हैदोस

सिरोंचा : तालुका मुख्यालयी डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाणसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात आहे.

वीज खांब धोकादायक

आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी खांब वाकलेले असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात.

स्वच्छतेची ऐशीतैसी

अहेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्याच्या अगदी बाजूला कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे स्वच्छतेची वाट लागत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासनातर्फे विविध योजना, तसेच स्पर्धा आयोजित करून गावांमध्ये स्वच्छता राहील, यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे गावकरी गावात स्वच्छता ठेवत आहेत.

अर्धवट पुलावरून प्रवास

धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्यात पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ कि.मी. अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालयात यावे लागते.

मच्छरदाण्या पुरवा

अहेरी : अहेरी, भामरागड, गडचिरोली या तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात १०० च्या आसपास शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. मात्र, बहुतांश आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेड व मच्छरदाणीची सुविधा नाही. त्यामुळे मच्छरदाण्यांचा पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.

प्रसूतिगृहात सुविधा द्या

आरमोरी : जिल्ह्यातील ३७६ आरोग्य केंद्रांपैकी ३५४ उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृह बांधण्यात आले आहेत. मात्र, सदर प्रसूतिगृह अत्यंत लहान असून, या प्रसूतिगृहांमध्ये आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव असल्याने गरोदर मातांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रसूतिगृहात सुविधा द्याव्यात.

निराधारांचे अनुदान वाढवा

कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमाह अत्यल्प अनुदान दिले जाते. सदर अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईमुळे खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.

बाेगस देयके वाढली

गडचिरोली : जिल्हाभरातील काही दुकानदार नकली बिल देऊन ग्राहक व शासनाची फसवणूक करीत आहेत. नकली बिल देणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अनेक दुकानदार ग्राहकांना बाेगस बिल देत आहेत.

रानवाही मार्ग खड्ड्यात

धानोरा : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्रामपंचायतीमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. चव्हेला- रानवाही या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने या भागातील वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड पंचाईत होत आहे. त्यामुळे मार्गाची दुरुस्ती करावी.

Web Title: Ignorant of animal husbandry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.