जिल्ह्यात क्रीडा कौशल्याची उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:09 AM2017-11-02T00:09:16+5:302017-11-02T00:09:29+5:30
ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळावा, त्यांच्यातूनही राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सर्व तालुका मुख्यालयी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय .....
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळावा, त्यांच्यातूनही राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सर्व तालुका मुख्यालयी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतला होता. त्याला आता पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी ही तालुका क्रीडा संकुले अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या गुणवंत खेळाडूंची उपेक्षा होत आहे.
प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारल्यास खेळाडूंना विविध खेळांचे तांत्रिक प्रशिक्षण, मार्गदर्शन मिळेल. त्यातून अनेक खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळून त्यांना विविध खेळांमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल या उदात्त हेतूने हा निर्णय घेतला होता. पण विविध कारणांनी जिल्ह्यातल्या १२ पैकी एकाही तालुक्यात क्रीडा संकुल पूर्णत्वास जाऊ शकले नाही.
क्रीडा संकुलांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये मंजूर आहेत. तरीही हे काम पूर्ण का झाले नाही हे एक कोडेच आहे. सध्या सिरोंचा, अहेरी, आरमोरी व देसाईगंज या चार ठिकाणच्या तालुका क्रीडा संकुलांची कामे अर्धवट झालेली आहेत. ७० ते ८० टक्के काम झाले आहे. पण पूर्ण काम कधी होईल हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. धानोरा, एटापल्ली, भामरागड व चामोर्शी येथे क्रीडा संकुलासाठी जागा मिळाली पण काम अद्याप सुरू झाले नाही. त्यासाठी संबंधितांना अद्याप मुहूर्तच सापडला नाही.
प्रत्येक तालुका क्रीडा संकुल कार्यालयात खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी एक तालुका क्रीडा अधिकारी, २ क्रीडा मार्गदर्शक, एक शिपाई, एक क्लार्क, एक महारेकरी अशी पदे राहणार आहेत. सिरोंचा, अहेरी, आरमोरी येथे ही पदे मंजूर झाली आहेत, पण ती भरलेलीच नाही. देसाईगंजमध्ये अद्याप पदेही मंजूर करण्यात आलेली नाहीत. ग्रामीण क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी तालुका क्रीडा संकुलांबाबतची ही उदासीनता लवकरात लवकर दूर करावी अशी अपेक्षा तमाम युवा खेळाडूवर्गाकडून होत आहे.
असे कसे आमदारांचे नियंत्रण?
तालुका क्रीडा संकुलांच्या उभारणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तालुका क्रीडा संकुल समित्या बनविण्यात आल्या आहेत. सुरूवातीला या समित्यांचे अध्यक्षपद संबंधित उपविभागीय अधिकाºयांकडे होते. पण नंतर ते त्या क्षेत्राच्या आमदारांकडे देण्यात आले. या समित्यांच्या बैठका होऊन त्यात संकुल उभारणीच्या कामाचा आढावा घेणे, अडचणी दूर करणे अपेक्षित आहे. मात्र समितीच्या बैठकाच होत नाही. त्यामुळे हे काम किती पूर्ण झाले, कशासाठी रखडले यावर आमदारांसह कोणाचेच नियंत्रण नाही.
तीन तालुक्यात जागाच मिळाली नाही
गडचिरोलीसह कोरची आणि कुरखेडा या तीन तालुक्यात क्रीडा संकुलासाठी अद्याप जागाच मिळाली नाही. तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचा सरकारचा धोरणात्मक निर्णय असताना त्यासाठी पाच वर्षात साधी एक हेक्टरसुद्धा जागा मिळू नये यावरून या विभागाचा कारभार किती प्रामाणिकपणे सुरू आहे याची कल्पना येते.
सार्वजनिक बांधकाम विभागावर अविश्वास
कोणतेही शासकीय बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची निर्मिती केली आहे. त्यांच्यामार्फत छोटी-मोठी सर्व बांधकामे केली जातात. पण क्रीडा विभागाला त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीची कामे या विभागाने स्वत:च टेंडर बोलवून दिली आहेत. त्यामुळेच ही कामे रखडली असल्याचा नाराजीचा सूर खेळाडूंकडून व्यक्त होत आहे. समितीचे अध्यक्ष या नात्याने संबंधित आमदारांना विनाकारण यात युवा वर्गाची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे.
संकुलात अशा राहतील सोयीसुविधा
तालुकास्तरावरील क्रीडा संकुल १ ते २ हेक्टर जागेत उभारले जाणार आहे. त्यात एक रनिंग ट्रॅक, बहुउद्देशिय सभागृह, प्रसाधन गृह, क्रीडा विभागाचे कार्यालय, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल अशा स्थानिक खेळांची मैदाने आदींचा त्यात समावेश राहणार आहे. पण बांधकामाचे भिजत घोंगडे सुरू असल्यामुळे या सोयी उपलब्ध होणे हे अजून तरी दिवास्वप्नच राहिले आहे.